Indian Premier League 2024 Time Table :- बीसीसीआयतर्फे दरवर्षी आयोजित होत असलेल्या या आयपीएल स्पर्धेच्या पुढील मोसमातील आयोजन कधी होणार याबाबत अद्याप संभ्रम कायम राहिला आहे. भारतात याच कालावधीत लोकसभेच्या निवडणूका होण्याची शक्यता आहे. याबाबत अद्याप केंद्र सरकारकडून काहीही जाहीर करण्यात आलेले नाही. पहिल्या अनधिकृत वेळापत्रकानूसार ही स्पर्धा 22 मार्चपासून सुरु होणार असे सांगितले जात होते मात्र, त्यातही आता बदल होण्याची शक्यता आहे.
दरवर्षी मार्च ते मे महिनाअखेर हा कालावधी या स्पर्धेसाठी विंडो म्हणून राखून ठेवलेला असतो. यंदा मात्र, याबाबत बदल होऊ शकतो. केंद्र सरकारने जर लोकसभा निवडणूकीचे वेळापत्रक जाहीर केले तर आयपीएल स्पर्धेच्याही वेळापत्रकात बदल होइल किंवा संपूर्ण स्पर्धाच अन्य देशात हलवण्यात येइल, असेही संकेत मिळत आहेत.
दरम्यान, इंडियन प्रिमियर लीग अर्थात आयपीएलच्या 17व्या हंगामासाठी खेळाडूंचा मेगा लिलाव नुकताच( 19 डिसेंबर) अमिरातीत पार पडला. अनेकार्थांनी विक्रमी व ऐतिहासिक ठरलेल्या या लिलावात खेळाडूंवर मोठ्या प्रमाणावर पैशांचा वर्षाव झाला. या लिलावात 24.75 कोटींना विकला गेलेला ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क सर्वाधिक भाव खाऊन गेला ज्यामुळे आता तो आयपीएल इतिहासातील सर्वांत महागडा खेळाडू ठरला आहे. स्टार्कला कोलकाता नाईट रायडर्सने खरेदी केले आहे.
आयपीएलच्या मिनी ऑक्शन लिलावात 332 खेळाडूंवर बोली लावली जाणार होती, परंतु सर्व 10 संघांना फक्त 77 जागा रिक्त होत्या. अशा स्थितीत केवळ 72 खेळाडू विकले गेले होते, त्यापैकी 30 विदेशी खेळाडू होते. या लिलावात आयपीएल संघानी 230 कोटी रूपये खर्चुन 72 खेळाडूंची खरेदी केली. त्यामध्ये चेन्नईच्या ताफ्यात 6, दिल्लीत 9, गुजरातने 8, कोलकाता 10, लखनऊने 6, मुंबईने 8, पंजाबने 8, राजस्थानने 5, बंगळुरूने 6 आणि हैदराबादने 6 खेळाडूंची खरेदी केली.