चेन्नई : IPL 2023 च्या एलिमिनेटर सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा सामना मुंबई इंडियन्सशी होत आहे. दोन्ही संघांना हा सामना जिंकून दुसऱ्या क्वालिफायरमध्ये गुजरातचा सामना करायचा आहे.
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात आठ गड्यांच्या मोबदल्यात 182 धावा केल्या असून लखनौसमोर विजयासाठी 183 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. मुंबईकडून कॅमेरून ग्रीनने सर्वाधिक 41 धावा केल्या. मात्र, सूर्यकुमार यादव(33), तिलक वर्मा(26) आणि नेहल वढेरा (23) यांच्या उपयुक्त खेळींनी मुंबईची धावसंख्या 180 धावांच्या पुढे नेली.
लखनौकडून नवीन-उल-हकने चार बळी घेत मुंबईला 200 धावांचा टप्पा पार करण्यापासून रोखले. यश ठाकूरला तीन आणि मोहसीन खानला एक विकेट मिळाली. चेन्नईच्या खेळपट्टीवर ही धावसंख्या फार कमी नाही, पण दुसऱ्या डावात दव पडल्यास लखनौच्या फलंदाजांना धावा करणे सोपे जाईल.
दरम्यान, प्लेऑफमध्ये मुंबई इंडियन्सचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. मुंबईने प्लेऑफमध्ये 18 सामने खेळले असून 12 जिंकले आहेत. मुंबईने सर्वाधिक पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.