पिंपरी – जगभरातील मराठा बांधवांना संघटित करुन आर्थिक आणि सामाजिक उन्नतीचे कार्य उभा करणारे दिवंगत मराठा प्रवीण पिसाळ यांच्या कुटुंबीयांना आमदार महेश लांडगे यांनी मदतीचा हात दिला आहे.
सातारा जिल्ह्यातील प्रवीण पिसाळ या तरुणाने मराठा समाजासाठी संघटन करुन “वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन’ची स्थापना केली. त्या माध्यमातून समाजातील तरुणांना नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहण्याची प्रेरणा दिली. वैद्यकीय, रोजगार आणि व्यवसायात मदतीसाठी पुढाकार घेतला. मात्र, प्रवीण पिसाळ यांचे नुकतेच अकाली निधन झाले. भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी पिसाळ कुटुंबीयांच्या घरी भेट दिली आणि सांत्वन केले. तसेच, कर्तव्यनिधी म्हणून 5 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला आणि पिसाळ यांची मुलगी शुभ्रा हिच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याचा मनोदय व्यक्त केला.
आईंना अश्रू अनावर
घर-प्रपंचापेक्षा मराठा समाजातील तरुणांच्या मदतीसाठी तत्पर रहाणारा मुलगा अचानक सोडून गेला. पिसाळ कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यामुळे संपूर्ण राज्यातील मराठा समाजाकडून आधार देण्याचा प्रयत्न होत आहे. आमदार महेश लांडगे यांनीही घरी भेट दिली. आर्थिक मदत करीत यापुढील काळात कुटुंबाला मदतीसाठी पुढाकार घेण्याचा मनोदय केला. विशेष म्हणजे, प्रवीण पिसाळ यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे प्रवीण पिसाळ यांच्या आईंना अश्रू अनावर झाले. तसेच, प्रवीणने मराठा समाजासाठी सुरू केलेल्या कार्यात आता आमदार महेश लांडगे यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन उपस्थित ग्रामस्थांनी केले.
सातारा : आमदार महेश लांडगे यांनी पिसाळ कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.