अहमदाबाद – क्वालिफायर 2 मध्ये गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली आहे. आयपीएल 2023 ची फायनल येत्या 28 मे रोजी रविवारी होणार आहे. गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किग्सं हे दोन्ही संघ एकमेकांच्या विरुद्ध मैदानात उतरणार आहेत.
गुजरात टायटन्सचा संघ आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्याने शुक्रवारी (26 मे) क्वालिफायर-2 मध्ये पाच वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा पराभव केला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरातने 62 धावांनी विजय मिळवला. पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरातने 20 षटकांत 3 बाद 233 धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईचा संघ 18.2 षटकांत 171 धावांवर गारद झाला.
मुंबई इंडियन्सला 234 धावांचे आव्हान मिळाल्यानंतर मैदानात फलंदाजीसाठी रोहित शर्मा आणि नेहाला वढेरा उतरला. ईशान किशनला दुखापत झाल्यामुळे नेहाला वधेराला सलामी फलंदाज म्हणून उतरण्याची संधी मिळाली. परंतु यावेळी मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली. रोहित 8 तर वधेरा 4 धावा काढून बाद झाले. त्यानंतर मुंबई इंडियन्सकडून कॅमेरून ग्रीनने 30, सूर्यकुमार यादवने 61, तिलक वर्माने 43 धावा केल्या. याव्यतिरिक्त मुंबईच्या इतर कोणत्याही फलंदाजाला दोन अंकी धाव संख्या करता आली नाही. अखेर मुंबई इंडियन्सचा 62 धावांनी पराभव झाला.
गुजरातच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. मोहम्मद शमीने पहिल्या दोन षटकांत रोहित आणि नेहलला बाद करून गुजरातला मोठं यश मिळवून दिले. त्याच्यापाठोपाठ मोहित शर्माने पाच विकेट घेत संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला. याशिवाय गोलंदाजीत राशिद खानने दोन आणि जोशुआ लिटल याला एक विकेट मिळाली.
तत्पूर्वी, मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत गुजरातला प्रथम फलंदाजीस पाचारण केलं होतं. प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने शुभमन गिलच्या आक्रमक शतकाच्या जोरावर निर्धारित 20 षटकात 3 विकेटच्या मोबदल्यात 233 धावा केल्या.
शुभमन गिलशिवाय साई सुर्दशन आणि हार्दिक पंड्या यांनी आक्रमक फलंदाजी केली. शुभमन गिलने 60 चेंडूत 129 धावांची खेळी केली. 17व्या षटकातील पाचव्या चेंडूवर त्याला आकाश मधवालने टिम डेव्हिडकरवी झेलबाद केले. गिलने आपल्या खेळीत 7 चौकार आणि 10 षटकार लगावले.
गिलचे हे चार सामन्यातील तिसरे शतक आहे. साखळी फेरीतील शेवटच्या दोन सामन्यांमध्ये त्याने सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध शतके झळकावली. गिलशिवाय साई सुदर्शनने 31 चेंडूत 43 धावा केल्या. सुदर्शन Retired Out झाला. कर्णधार हार्दिक पंड्याने 13 चेंडूत नाबाद 28 धावा केल्या. त्याने दोन चौकार आणि दोन षटकार मारले. रिद्धिमान साहाने 16 चेंडूत 18 धावा केल्या. रशीद खानने दोन चेंडूत नाबाद पाच धावा केल्या.
मुंबई इंडियन्सकडून गोलंदाजीत आकाश मधवाल आणि पियुष चावला यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. मधवाल याने 4 षटकात 52 तर चावला याने 3 षटकांत 45 धावा दिल्या.