बेंगळुरू – आयपीएलच्या यंदा झालेल्या मेगा लिलावात परदेशी खेळाडूंपेक्षा जास्त सरस ठरले ते भारतीय क्रिकेटपटू. इशान किशन, हर्षल पटेल, दीपक चहर, श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर व आवेश खान यांनी लिलावात सर्वाधिक भाव खाल्ला आहे.
मुंबई इंडियन्सने सर्वात मोठी रक्कम देऊन इशान किशनला खरेदी केले. तो यंदाच्या मोसमातील महागडा खेळाडू ठरला. इशानला मुंबई इंडियन्सने तब्बल 15 कोटी 25 लाख दिले. भारतीय संघाचे सर्वाधिक 6 खेळाडू असून, 4 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.
मुंबई इंडियन्स आणि अन्य संघांनी खरेदी केलेल्या खेळाडूंच्या तुलनेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचे दोन खेळाडू महागड्या खेळाडूंच्या यादीत आहेत. बेंगळुरूने दोन अष्टपैलू खेळाडूंसाठी प्रत्येकी 10 कोटी 75 लाखांची बोली लावली. यात भारतीय हर्षल पटेल आणि वानिंदु हसरंगा या दोघांचा समावेश आहे.
महागडे ठरलेले खेळाडू
मुंबई इंडियन्स – इशान किशन – 15 कोटी 25 लाख
चेन्नई सुपर किंग्ज – दीपक चहर 14 कोटी
कोलकाता नाईट रायडर्स – श्रेयस अय्यर 12 कोटी 25 लाख
पंजाब किंग्ज – लियाम लिव्हिंगस्टोन 11 कोटी 50 लाख
दिल्ली कॅपिटल्स – शार्दुल ठाकूर 10 कोटी 75 लाख
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू – हर्षल पटेल 10 कोटी 75 लाख
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू – वानिंदु हसरंगा 10 कोटी 75 लाख
सनरायझर्स हैदराबाद – निकोलस पूरन 10 कोटी 75 लाख
गुजरात टायटन्स – लॉकी फर्ग्युसन 10 कोटी
लखनौ – आवेश खान 10 कोटी
दरम्यान, रॉयल चॅलेंजर बेंगळुरू संघाने आपल्याच पायावर दगड मारून घेतला असेच चित्र यंदाच्या आयपीएल स्पर्धेच्या लिलावात दिसून आले. गेल्या मोसमात अफलातून कामगिरी केलेल्या हर्षल पटेलला बेंगळुरूने मुक्त केले होते. मात्र, त्याची उपयुक्तता लक्षात घेत यंदाच्या लिलावात त्याला पुन्हा मोठी बोली लावून आपल्याकडेच घेतले.
मात्र, या प्रक्रियेत केवळ 20 लाख रुपये बेसप्राइज असलेल्या हर्षलची भक्कम पगारवाढ झाली व त्याला बेंगळुरूने तब्बल 10.75 कोटी रुपयांना पुन्हा खरेदी केले. वास्तविक गेल्या मोसमात बेंगळुरूकडूनच नव्हे तर संपूर्ण स्पर्धेत सर्वात जास्त बळी घेणारा गोलंदाज ठरूनही त्याला मुक्त का करण्यात आले, अशीच टीका त्यांच्या संघावर आता होत आहे.