मुंबई -यंदाच्या मोसमातही खराब कामगिरीमुळे पराभव पत्करावा लागत असलेल्या कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स् यांच्या शनिवारी सामना होणार आहे. हे दोन्ही संघ पुन्हा विजयी मार्गावर परतण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
विश्वचषक विजेता इंग्लंड संघाचा कर्णधार इयॉन मॉर्गन याच्या नेतृत्वाखालील कोलकाताला आणि कमी अनुभव असणाऱ्या संजू सॅमसन याच्या नेतृत्वाखालील राजस्थान संघाला आतापर्यंत चांगले प्रदर्शन करता आलेले नाही. दोन्ही संघांच्या समस्याही एकसारख्या आहेत. ती म्हणजे, पहिल्या फळीतील फलंदाज संघासाठी मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरले आहेत. गत सामन्यात दोन्ही संघांमधील मधल्या फळीतील फलंदाजांनी निर्णायक खेळी केली होती. परंतु विजयासाठी यापेक्षा चांगली कामगिरी करणे आवश्यक आहे.
कोलकाता संघाने पहिल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादवर विजय मिळविला होता. यानंतर सलग तीन सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. राजस्थाननेही चार सामन्यांपैकी तीन सामने गमाविले आहेत. आता दोन्ही संघ पुन्हा विजय मार्गावर परतण्यासाठी उत्सुक आहेत.
मागील सामन्यात चेन्नईविरुद्ध सलामीच्या फलंदाजांच्या अपयशानंतरही पॅट कमिन्सने शानदार फलंदाजी करत संघाला विजयासमीप नेले होते. मात्र, अखेर त्यांना 18 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. आता पहिल्या फळीतील फलंदाज शुभमन गिल आणि मॉर्गन यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. तसेच दिनेश कार्तिक आणि आंद्रे रसेल फॉर्मात आल्याने संघासाठी ही एक सकारात्मक बाब आहे.
दुसरीकडे बंगळुरू संघाकडून दारुण पराभव झाल्यानंतर राजस्थान संघ मैदानात उतरत आहे.
सॅमसनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या संघाने दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिल्टस्विरोधात विजय मिळविला आहे. सॅमसनने यंदाच्या मोसमातील पंजाब किंग्जसोबतच्या पहिल्या लढतीत 119 धावांची खेळी केली होती. मात्र, त्यानंतर त्याला धावांसाठी संघर्ष करावा लागत आहे. याशिवाय जॉस बटलर, मनन व्होरा आणि डेव्हिड मिलरही फॉर्मात नसल्याने संघ अडचणीत आहे. तसेच राजस्थान संघासाठी गोलंदाजीही डोकेदुखी ठरत आहे. कारण ख्रिस मॉरिस आणि मुस्तफिजूर रहमान हे धावा रोखण्यात अपयशी ठरत आहे. जोफ्रा आर्चर आणि बेन स्टोक्स जखमी असल्याने संघाची समस्यादेखील वाढली आहे. यामुळे विजयासाठी त्यांना कडवा संघर्ष करावा लागणार आहे.
सामन्याची वेळ
सायंकाळी : 7ः30
ठिकाण ः वानखेडे स्टेडीयम, मुंबई
थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्ट्सवर