#IPL2021 #CSKvKKR #Final | आयपीएलच्या विजेतेपदासाठी आज रंगणार चुरस

चेन्नईला रोखण्याचे कोलकातासमोर आव्हान

दुबई –आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमातील अंतिम फेरीत शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्ज व कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात महत्त्वपूर्ण लढत होत आहे. यंदाच्या स्पर्धेतील विजेतेपदासह इतिहासात चौथ्या वेळा करंडक उंचावण्यासाठी महेंद्रसिंह धोनीची सेना सज्ज आहे. तर दुसरीकडे आपले तिसरे विजेतेपद साकार करण्यासाठी इयान मॉर्गन आणि कंपनी आशावादी आहे.

या स्पर्धेच्या साखळी फेरीच्या सामन्यांत या दोन्ही संघांनी सरस कामगिरी केली आहे. मात्र, यंदाच्या स्पर्धेत कोणत्याही संघाला एकतर्फी विजय मिळवता आलेला नाही. कोलकाता व चेन्नई या दोन्ही संघांना आपल्या मधल्या फळीतील फलंदाजांकडून ज्या अपेक्षा होत्या त्या सातत्याने पूर्ण झालेल्या नाहीत. दोन्ही संघांना आतापर्यंत झालेल्या सर्व सामन्यात मोठी सलामी मिळालेली नाही. तसेच या दोन्ही संघाकडे अष्टपैलुंचा भरणा जास्त असूनही त्यांच्याकडून चमकदार कामगिरी झालेली नाही.

कोलकाताकडे व्यंकटेश अय्यर सारखा अफलातून सलामीवीर फलंदाज व उपयुक्त गोलंदाज असल्याने ते चेन्नईसमोर तगडे आव्हान निर्माण करु शकतात. मात्र, कोलकाताच्या फलंदाजांनी ज्या पद्धतीने दिल्लीविरुद्धच्या क्वालिफायर 2 गटाच्या सामन्यात आपल्या विकेट गमावल्या त्या पाहता चेन्नईच्या जास्त सरस गोलंदाजीचा ते कसा सामना करतात हेच पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कोलकाताचा सगळा भार शुभमन गिल, व्यंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी, सुनील नरेन, नितिश राणा यांच्यावरच राहणार आहे. खुद्द कर्णधार इयान मॉर्गन व दिनेश कार्तिक सातत्याने अपयशी ठरत असल्याने कोलकाताला चिंता राहणार आहे. त्यांची गोलंदाजी देखील चेन्नईच्या तोडीची नसल्याने त्यांना खूपच अचूक गोलंदाजी करावी लागणार आहे. याबाबतीत त्यांची संपूर्ण मदार वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन व शिवम मावी यांच्यावरच राहणार आहे. या जोडीने यंदाच्या स्पर्धेतील जवळपास प्रत्येक सामन्यात सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्यांच्या जोडीला वरुण चक्रवर्ती व नरेन यांची फिरकीही असेल त्यामुळे चेन्नईच्याही फलंदाजीचा कस लागणार आहे.

दुसरीकडे चेन्नई संघ जास्त सशक्त वाटतो. त्यातच ऋतुराज गायकवाडने अफलातून सातत्य दाखवले आहे. त्याला साथ देत रॉबिन उथप्पा, अंबाती रायडू, फाफ डुप्लेसी, शार्दुल ठाकूर, मोईन अली व रवींद्र जडेजा यांच्याकडूनही जास्त सरस कामगिरीची अपेक्षा आहे. कर्णधार धोनीने दिल्लीविरुद्धच्या क्वालिफायर 1 लढतीत आपला जुना बहर सिद्ध करताना आपणच बेस्ट फिनिशर असल्याचे दाखवून दिल्याने कोलकाताला चेन्नईच्या वादळी फलंदाजीला रोखण्याचेच मोठे आव्हान राहणार आहे.

तसेच गोलंदाजीच्या बाबतीतही चेन्नईचा संघ कोलकातापेक्षा सरस दिसत आहे. ड्‌वेन ब्राव्हो, जोश हेझलवूड, शार्दुल ठाकूर व दीपक चहर यांच्यासमोर कोलकाताचे फलंदाज कशी कामगिरी करणार हे महत्त्वाचे आहे. तसेच फिरकी गोलंदाजीतही मोईन अली व रवींद्र जडेजा यांनी वर्चस्व राखले आहे.

धोनीच निर्णायक ठरणार

जागतिक क्रिकेटमध्ये बेस्ट फिनिशरची भूमिका सातत्याने निभावणारा चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी हाच या सामन्यातही निर्णायक ठरणार आहे. गेल्या काही सामन्यांत त्याची कामगिरी चांगली झाली नव्हती व त्याच्यावर टीकाही सरु झाली होती. मात्र, दिल्लीविरुद्धच्या लढतीत धोनीने जी कमाल खेळी केली ती पाहता कोलकातासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. धोनीला कसे रोखायचे यासाठी त्यांना निश्‍चितच योजना तयार करावी लागणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.