#IPL2020 : कोकाकोला किंवा जिओची प्रायोजकता मिळणार

बीसीसीआयच्या बैठकीत होणार निर्णय

पुणे – चीनच्या व्हिवो या कंपनीने आयपीएल स्पर्धेची प्रायोजकता सोडल्यानंतर आता बीसीसीआय समोर जिओ किंवा कोकाकोला या दोन कंपन्यांचा पर्याय आला आहे. या दोन्ही कंपन्यांनी यापूर्वी देखील काही स्पर्धांसाठी प्रायोजकता दिली असल्याने बीसीसीआयचा शोध संपणार असल्याचे सांगितले
जात आहे.

चीनबाबतचा देशातील असंतोष वाढत चालल्याने त्यांच्याच व्हिवो कंपनीशी प्रायोजकतेचा असलेला करार संपुष्टात आणला जावा, अशी मागणी अनेक स्तरांतून होत आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या निर्णयापूर्वीच व्हिवोने हा करार संपुष्टात आणण्याची घोषणा केली होती. अर्थात, दोन्ही देशांचे संबंध जर पूर्ववत झाले तर पुन्हा हा करार केला जाण्याचेही संकेत दिले होते. मात्र, आता आयपीएल स्पर्धा तोंडावर आलेली असताना अचानक हा करार मोडण्याच्या शक्‍यतेने बीसीसीआयचे धाबे दणाणले होते. इतक्‍या कमी कालावधीत नवा प्रायोजक कसा शोधायचा, असा पेच निर्माण झाला होता. मात्र, काही वर्षांपूर्वी कोकाकोला कंपनीने बीसीसीआयला विविध स्पर्धांसाठी प्रायोजकत्व दिले होते. तसेच रिलायन्स समूहाचा भाग असलेल्या जिओ कंपनीकडेही प्रायोजकता देण्याबाबत बोलणी केली जाऊ शकतात.

आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेला मुंबई इंडियन्स संघ रिलायन्सच्या मालकीचा असल्याने काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात. मात्र, सध्या तरी बीसीसीआयकडे या दोन कंपन्यांचा पर्याय खुला आहे. चीनची व्हिवो कंपनी बीसीसीआयला आयपीएलच्या प्रत्येक मोसमाचे 440 कोटी रुपये देत होती. हा एकूण करार 2 हजार 199 कोटी रुपयांचा होता. आता कोकाकोलाबाबत बोलायचे तर व्हिवोपोक्षाही जास्त रक्‍कम ही कंपनी बीसीसीआयला देऊ शकते. व्हिवोपेक्षा प्रचंड मोठी कंपनी असल्याने बीसीसीआयच्या अपेक्षेपेक्षाही जास्त रकमेचा करार केला जाऊ शकतो. त्याचवेळी जिओकडूनही बीसीसीआयला प्रस्ताव दिला जाण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. आता येत्या दोन दिवसांत याबाबत निर्णय होण्याची शक्‍यता आहे.

पेप्सिकोही शर्यतीत

यापूर्वी बीसीसीआयशी पेप्सिको कंपनीने करार केला होता. त्यांच्याकडून बीसीसीआयला 396 कोटी रुपये प्रत्येक मोसमासाठी दिले जात होते. त्यामुळे बीसीसीआयने जर पुन्हा कमी कालावधीत निविदा काढल्या तर त्यात पेप्सिकोही सहभाग घेऊ शकते, असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.