#IPL2020 : राजस्थान व पंजाबमध्ये वर्चस्वाचा सामना

शारजा – आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्स व किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात आज वर्चस्वाचा सामना रंगणार आहे. दोन्ही संघांनी फलंदाजी बळकट करण्यावर भर दिला असला तरीही या सामन्यासाठीची खेळपट्टी पाहता फिरकी गोलंदाज चमत्कार करतील अशीच अपेक्षा व्यक्‍त केली जात आहे. 

या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात राजस्थानने चेन्नई सुपर किंग्जला पराभूत केले होते. या सामन्यात संजू सॅमसन याने धडाकेबाज फलंदाजी केली होती. त्याने षटकारांची बरसात करत आपला दर्जा सिद्ध केला होता. कर्णधार स्टिव्ह स्मिथ हादेखील भरात असल्याने त्यांना सलामीची चिंता नसल्याचेही स्पष्ट होत आहे. अशा स्थितीत यशस्वी जयस्वाल, डेव्हिड मीलर व रॉबीन उथप्पा यांना मात्र, आपली जबाबदारी ओळखून खेळ करावा लागणार आहे.

गोलंदाजीत जोफ्रा आर्चर, टॉम कुरेन, राहुल तेवतिया यांनी किफायती गोलंदाजी केली असून त्यांना लोकेश राहुलसह मयंक आग्रवाल यांना रोखावे लागणार आहे. राहुलने पहिल्या सामन्यातील अपयश धुवून काढताना बेंगळुरूविरुद्धच्या सामन्यात आक्रमक नाबाद शतकी खेळी केली होती. त्यामुळे राहुलला कसे रोखायचे यासाठी त्यांना रणनीती बनवावी लागणार आहे.

दुसरीकडे पंजाबचा संघ सांघिक कामगिरीच्या जोरावर राजस्थानला आश्‍चर्याचा धक्‍का देऊ शकतो. पहिल्या सामन्यात आग्रवालने तर दुसऱ्या सामन्यात राहुलने संघाची धावसंख्या एकहाती पेलली होती. मात्र, निकोलस पुरन, ग्लेन मॅक्‍सवेल, करुण नायर व सर्फराज खान यांना येत असलेले अपयश त्यांच्यासाठी चिंता वाढविणारे ठरू शकते. फलंदाजीच्या मनाने त्यांची गोलंदाजी जास्त सरस वाटते. प्रमुख गोलंदाज महंमद शमी याच्यासह शेल्डन कोट्रेल, मुरुगन अश्‍विन, रवी बिष्णोई यांनीही अचूक मारा केल्यामुळे त्यांच्या गोलंदाजीचा सामना करण्याचे मोठे आव्हान स्मिथ आणि कंपनीसमोर आहे.

पंजाबने अद्याप सलामीवीर आक्रमक फलंदाज ख्रिस गेल याला खेळवलेले नाही. त्यामुळे आजच्या सामन्यात त्याला खेळविण्याची शक्‍यता जास्त आहे. निकोलस पुरनला दोन्ही सामन्यात अपयश आल्याने गेलचा संघात समावेश करून फलंदाजी आणखी भक्कम करण्याचा पंजाबचा प्रयत्न असेल. तसेच दीपक हुडा याचादेखील समावेश होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. फिरकी गोलंदाजीवर आक्रमक खेळाने वर्चस्व राखण्यात आग्रवाल याच्यासह हुडादेखील समर्थ असल्याने राहुल त्यांना संधी देऊ शकतो.

फलंदाजांसाठी नंदनवन 

शारजाच्या खेळपट्टीवर किमान 200 ते 220 धावा होतील असा अंदाज व्यक्‍त करण्यात येत आहे. या खेळपट्टीचा इतिहास पाहता ही खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन ठरणार आहे. मात्र, दुसऱ्या डावात गोलंदाजांना मैदानातील दवामुळे चेंडू ग्रीप करताना कठीण जाणार असल्याने नाणेफेक जिंकणारा संघ पहिल्यांदा फलंदाजी करण्याचाच निर्णय घेण्याची शक्‍यता जास्त आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.