#IPL2020 : गावसकर यांच्यासाठी रोहनची बॅटिंग

सवयीचा शब्दही चुकीचा वाचला जातो

नवी दिल्ली  – विराट कोहलीबाबत मत व्यक्‍त करताना त्याची पत्नी व अभिनेत्री अनुष्का शर्माचाही उल्लेख केल्याने टीकेचे धनी झालेल्या सुनील गावसकर यांच्या मदतीला त्यांचा मुलगा रोहन याने ट्‌विट केले आहे. या ट्‌विटमध्ये चॉकलेट हा शब्द मुद्दाम चुकीचा लिहिला आहे. मात्र, शब्द जरी चुकीचा लिहिला तरीही लोक त्यांना अपेक्षित अर्थच काढतात, असे सांगत त्याने माध्यमांनी आपल्या वडिलांच्या वक्‍तव्याचा विपर्यास केल्याचे सांगितले आहे.

गावसकर यांनी पंजाब आणि बेंगळुरू सामन्यात थेट समालोचन सुरू असताना कोहलीवर टीका केली होती. देशात लॉकडाऊन होते त्यामुळे विराटने अनुष्काच्या गोलंदाजीवरच सराव केला असे दिसते, असे उपरोधिक मत व्यक्‍त केले होते. मात्र, त्यांच्या वक्‍तव्याचा दुसराच अर्थ माध्यमांनी काढला. यामुळे गावसकर यांच्यावर अनुष्कासह अनेकांनी टीका केली. तसेच त्यांना समालोचकांच्या पथकातूनही बाहेर काढावे असे मत व्यक्‍त केले होते.

त्यावर आपल्या वक्‍तव्याचा विपर्यास केल्याचे गावसकर यांनी सांगितले होते. मात्र, तरीही सोशल मीडियावर त्यांच्यावर अजूनही टीका सुरू असल्याने त्यात आता रोहन याने उडी घेत आपल्या वडिलांची बाजू घेतली आहे. त्यासाठी त्याने एक ट्‌विट केले असून त्यात चॉकलेट हा शब्द मुद्दाम चोलोकेट असा चुकीचा लिहिला आहे.

मात्र, मी शब्द जरी मुद्दाम तसा लिहिला असला तरीही लोक सवयीप्रमाणे तो चॉकलेट असाच वाचतात, कारण व्यक्‍ती कोणतीही असो ती त्याला अभिप्रेत असलेला व सवयीचाच शब्द वाचते. मात्र, जर लोकांनी शांतपणे वाचले किंवा ऐकले तर त्यांना त्यातील तथ्य समजून येते, असे मत व्यक्‍त करत माध्यमांना गावसकर यांना काय म्हणायचे होते तेच समजून घेतले नाही व त्यांच्या उपरोधिक टीकेला मीठ-मसाला लावून रंगतदार करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, असेही त्याने सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.