मुंबई – शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एका पंचतारांकित हॉटेल मध्ये भेट घेऊन सुमारे अडीच तास चर्चा केल्याने राज्य सरकारच्या भवितव्याविषयी अनेक शंकाकुशंका उपस्थित केल्या जात असतानाच ते वातावरण निरस्त करण्याचा भाग म्हणून आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेऊन त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.
त्या बैठकीला कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हेही उपस्थित होते. सत्तारूढ आघाडीत कोणताही बेबनाव नाही तिन्ही घटक पक्षांचा एकमेकांशी चांगला समन्वय आहे असा संदेश यानिमीत्तान सर्वत्र पोहोचवण्याचा प्रयत्न केला गेला असावा असेही मानले जात आहे.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या अधिकृत निवासस्थानी ही चर्चा झाली. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हेही यावेळी तिथे उपस्थित होते. सुमारे पाऊण तास या तीन नेत्यांमध्ये चर्चा झाली. फडणवीस- राऊत यांच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर या चर्चेला महत्व आहे.
फडणवीस- राऊत चर्चेने निर्माण झालेले मळभ या निमीत्ताने दूर करण्याचा प्रयत्न या तीन वरीष्ठ नेत्यांनी जाणिवपुर्वक केला असेही सांगितले जात आहे. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याची माहिती अजून बाहेर आलेली नाही, किंवा या तीन पैकी एकाहीं नेत्याने त्या विषयी वाच्यता केलेली नाही.