हैदराबाद – कगिसो रबाडा, किमो पॉल आणि ख्रीस मॉरिसच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर दिल्ली कॅपिटल्सने सनरायजर्स हैदराबादचा 39 धावांनी पराभव करत आगेकूच केली.
नाणेफेक गमावून फलंदाजी करताना दिल्लीने 20 षटकांत 7 बाद 155 धावांची मजल मारली. प्रत्युत्तरात खेळताना हैदराबादला केवळ 116 धावाच करता आल्याने त्यांना 39 धावांनी पराभुत व्हावे लागले. 156 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करायला उतरलेल्या हैदराबादची सुरूवात चांगली झाली.
सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्ट्रो यांनी 9.5 षटकांत 72 धावांची सलामी दिली. मात्र, 41 धावा करुन बेअरस्ट्रो परतल्यानंतर डेव्हिड वॉर्नरने फटकेबाजीकरत हैदराबादला शंभरी ओलांडून दिली. मात्र, तो बाद झाल्यानंतर इतर हैदराबादच्या फलंदाजांनी केवळ हजेरी लावण्याचे काम केल्याने त्यांचा डाव 116 धावांतच संपुष्टात आला.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्लीचे सलामीवीर पृथ्वी शॉ 4 तर शिखर धवन 7 धावा करून परतल्यानंतर कॉलिन मुन्रो आणि कर्णधार श्रेयस अय्यरने फटकेबाजी करत दिल्लीची धावगती 10 च्या जवळपास पोहोचली होती. मात्र, अभिषेक वर्माच्या षटकात मोठा फटका मारण्याच्या नादात मुन्रो 40 धावांवर बाद झाला.
मुन्रो बाद झाल्यानंतर सावध खेळणाऱ्या श्रेयस अय्यरने फटकेबाजी करायला सुरूवात केली. यावेळी अय्यर आणि ऋषभने 12व्या षटकांत दिल्लीला शंभरी ओलांडून दिली. हे दोघेही दिल्लीला मोठी धावसंख्या उभारून देणार असे वाटत असताना अय्यर 45 धावा करून परतला. तर, त्या पाठोपाठ ऋषभ पंतदेखील 23 धावा करुन परतला. यानंतर इतर फलंदाजांनी निराशा केल्याने दिल्लीला 155 धावांची मजल मारता आली.