पुणे विद्यापीठातील प्रवेश आता केंद्रीय पद्धतीने

देशातील गुणवंत विद्यार्थ्यांनाही प्रवेशाची संधी : जुनी पद्धत मोडीत; प्रक्रियाही होणार सुलभ

– व्यंकटेश भोळा

पुणे – देशात दहावे स्थान मिळविलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आता प्रवेश घेणे सुकर होणार आहे. किंबहुना, देशातील गुणवंत विद्यार्थ्यांनाही प्रवेशाची संधी मिळण्याची चिन्हे आहेत. आता विद्यापीठात विभागनिहाय स्वतंत्रपणे प्रवेश प्रक्रिया न होता सर्व विभागाच्या प्रवेशासाठी एकच प्रवेश परीक्षा केंद्रीय पद्धतीने घेण्यात येणार आहे. त्याची सुरूवात येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार आहे.

पुणे विद्यापीठात 50 हून अधिक विभाग आहेत. विद्यापीठाच्या विभागात प्रवेश मिळणे, ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असते. त्यातून उत्तम शिक्षण, योग्य अध्यापन पद्धती आणि रोजगाराची संधी उपलब्ध होण्यास वाव मिळतो. त्यासाठी गुणवंत विद्यार्थी या प्रवेशासाठी प्रयत्न करतात. विभागात प्रवेशाची क्षमता कमी असते. त्यामुळे गुणवत्ता व आरक्षणानुसार प्रवेश मिळण्यासाठी तितकीच तयारी करावी लागते.

यापूर्वी विद्यापीठात विभागनिहाय प्रवेशप्रक्रिया राबविली जात होती. उदा. भौतिकशास्त्र विभागात प्रवेशासाठी विभागातर्फे संकेतस्थळावर प्रवेशप्रक्रिया प्रसिद्ध केली जायची. त्यानुसार विद्यार्थी ऑनलाइन अर्ज करीत असे. पात्र विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा घेतली जाते. गुणवत्तेनुसार प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी विभागामार्फत जाहीर केले जाते. त्यानंतर विद्यार्थी विभागात जाऊन प्रवेश निश्‍चित करतात. ही सर्व प्रक्रिया आता बंद होणार आहे.

नव्या निर्णयानुसार विद्यापीठाच्या सर्व विभागातील प्रवेशासाठी एकाच वेळी केंद्रीय पद्धतीने प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. या सर्व परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होतील. या परीक्षेची माहिती सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी योग्य पद्धतीने प्रसिद्धी दिली जाणार आहे. पुढच्या महिन्यात प्रवेश परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध होईल. त्यानुसार ऑनलाइन अर्ज मागविण्यात येतील. त्यानंतर त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी दै. “प्रभात’शी बोलताना दिली.

विद्यार्थ्यांची गैरसाय टळणार
एखादा विद्यार्थी पदव्युत्तर प्रवेशासाठी दोन-तीन विभागाच्या प्रवेशासाठी पात्र असायचा. त्याला तिन्ही विभागांच्या ठिकाणी स्वतंत्रपणे अर्ज करावे लागायचा. त्यासाठी शुल्क भरावे लागायचे. स्वतंत्र प्रवेश परीक्षा द्यावी लागायची. त्यात वेळेचा अपव्यय होत होता. त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रवेशाची संधी हुकली जायची. या सर्व पार्श्‍वभूमीवर आता केंद्रीय प्रवेश परीक्षा दिल्यास त्या विद्यार्थ्यांना उपलब्ध विभागासाठी प्रवेश संधी मिळणार आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून विद्यापीठाच्या विभागातील प्रवेशासाठी केंद्रीय पद्धतीने प्रवेशप्रक्रिया राबविण्यासाठी काम सुरू आहे. त्यासाठी यंत्रणाही कार्यान्वित करण्यात येत आहे. आता सर्व विभागात प्रवेशासाठी एकाच दिवशी केंद्रीय पद्धतीने परीक्षा घेतली जाईल. विशेष: म्हणजे परीक्षेचा निकालही त्याच दिवशी जाहीर होईल. एवढेच नव्हे, तर विद्यार्थ्यांना वसतिगृहाचे प्रवेशही त्याच दिवशी दिले जाणार आहेत. राज्यासह देशभरातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने प्रवेश निश्‍चित करणे शक्‍य होणार आहे.
– डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.