नवी दिल्ली – के.एल. राहुलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या लखनौ सुपर जायंट्सने आयपीएल 2023 च्या हंगामासाठी आपल्या नव्या कोऱ्या जर्सीचे अनावरण केले आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांच्या हस्ते लखनौची नवी जर्सी सर्वांसमोर आणली गेली आहे. यावेळी संघाचा कर्णधार राहुलसह दीपक हुड्डा आणि जयदेव उनाडकट हे खेळाडू देखील उपस्थित होते.
लखनौच्या नव्या जर्सीत पारंपरिक निळा रंग आणि त्यात साईड पॅनलला लाल रंगाच्या छटा वापरल्या आहेत. लखनौ आपला पहिला हंगाम 2022 मध्ये खेळला होता. पहिल्याच हंगामात राहुलच्या नेतृत्वात लखनौने तिसरे स्थान पटकावले. त्यांनी 17 सामन्यांपैकी 9 सामने जिंकले होते.
2023 मध्ये देखील लखनौ अशीच कामगिरी करण्यासाठी उत्सुक असेल. राहुलने आपले कसोटी आणि टी-20 संघातील स्थान गमावले असून त्याला यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी करणे आवश्यक आहे. राहुलने 2022 च्या हंगामात 600 पेक्षा जास्त धावा ठोकल्या होत्या. आता त्याच्याकडून अशाच प्रकारच्या कामगिरी अपेक्षा असेल.