पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे ते छत्रपती संभाजीनगर ही दोन शहरे आता अधिक जवळ येणार आहेत. पुणे ते छत्रपती संभाजीनगर या 230 किलोमीटर सहापदरी ग्रीन फिल्ड एक्सप्रेस वे ची निर्मिती करण्यासाठी मार्च महिन्यात सामंजस्य करार करण्यात आला. मात्र, त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे प्रकल्पाचे काम थांबले होते. आचारसंहिता संपल्यानंतर या प्रकल्पास गती मिळणार असून, भूसंपादनाचे काम प्राधान्याने हाती घेतले जाणार आहे. या प्रकल्पामुळे पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास दोन तासांचा होणार आहे.
समृद्धी महामार्गाने नागपूरहून छत्रपती संभाजीनगरला अवघ्या चार तासांत जाता येते. मात्र, छत्रपती संभाजीनगर येथून पुणे येथे पोहोचणे अधिक आव्हानात्मक झाले आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगर ते पुणे या सध्या अस्तित्वात असलेल्या वाहतुकीच्या कोंडीला टाळण्यासाठी नव्या महामार्गाची नितांत गरज होती.
ही गरज ओळखून आता पूणे ते छत्रपती संभाजीनगर या 230 किलोमीटर सहापदरी ग्रीन फिल्ड एक्सप्रेस वे ची निर्मिती करण्यासाठी राज्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग व केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयासमवेत या एक्स्प्रेसवेबाबत सामंजस्य करार करण्यात आला. पुणे ते छत्रपती संभाजीनगर या सध्या असलेल्या महामार्गावर वाहनांची वर्दळ ही अनेक पटीने वाढली आहे.
त्यामुळे या नवीन ग्रीन फिल्ड एक्स्प्रेसची आखणी करण्यात आली. भूसंपादनापोटी द्यावयाचा मोबदला यावर निर्णय होणे बाकी आहे. आचारसंहिता संपल्यानंतर यावर निर्णय होऊन भूसंपादन केले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
असा आहे ग्रीन कॅरिडोअर
– महामार्गाची एकूण लांबी असणार सुमारे 230 किलोमीटर
– पुणे, अहमदनगर आणि बीड या तीन जिल्ह्यांतून जाणार
– तीन जिल्ह्यांतील १२ तालुके आणि १२२ गावातून जाणार
– महामार्गासाठी २ हजार ८५५ हेक्टर जागा संपादन
– सहापदरी महामार्ग