आज (2 ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्ज अणि सनराइजर्स हैदराबाद संघात आयपीएलच्या तेराव्या हंगामातील 14वा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, दुबई येथे होणार आहे. या सामन्याला संध्याकाळी साडेसात वाजता सुरवात होईल.
चेन्नई सुपर किंग्ज हा संघ सहा दिवसांच्या विश्रांतीनंतर आजचा सामना खेळणार आहे. आतापर्यंत चेन्नई संघानी तीन सामने खेळले असून फक्त एक विजय मिळवला आहे तर सलग दोन पराभव झाले आहेत. पहिल्या सामन्यात अंबाती रायडू दमदार खेळी करत मुंबई संघा विरुद्ध विजय मिळवून दिला होता, त्यानंतर दुखापतीमुळे तो खेळू शकला नव्हता. मात्र आजच्या सामन्यात अंबाती रायडू अणि ड्वेन ब्राव्हो दोघेही खेळणार आहेत. त्यामुळे चेन्नई संघाला बळकटी मिळणार आहे.
सनराइजर्स हैदराबाद संघाला पहिल्या दोन सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. मात्र दिल्ली संघाविरुद्ध दमदार प्रदर्शन करत तिसरा सामना जिंकला. राशीद खान अणि भुवनेश्वर कुमार यांच्या भेदक गोलंदाजीमुळे सामना जिंकता आला. आतापर्यंत चेन्नई अणि हैदराबाद संघात 12सामने झाले असून 9 सामने चेन्नई संघाने जिंकले आहेत तर हैदराबादने फक्त 3 सामन्यात विजय मिळविला आहे.
त्यामुळे आजच्या सामन्यात चेन्नई संघाचे पारडे जड असेल,तरी दोन्ही संघात काट्याची टक्कर होणार आहे. यामुळे कोण दुसरा विजय नोंदवणार हे बघणे उत्सुकतेच ठरेल.