अबब ! ‘या’ कपंनीतील तब्बल वीस हजार कर्मचारी करोनाग्रस्त

न्यूयॉर्क – अमेरिकेतल्या अ‍ॅमेझॉन कंपनीतील 20 हजारांहून अधिक कर्मचारी करोनाग्रस्त झाल्याचे आढळून आले आहे. कंपनीने प्रथमच स्वतःहून ही माहिती दिली आहे. तथापि, अमेरिकेच्या करोनाच्या राष्ट्रीय प्रमाणापेक्षा आमच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना झालेल्या करोना लागणीचे हे प्रमाण खूपच कमी आहे, असे कंपनीने म्हटले आहे.

कंपनीतील कामगारांनी आणि त्यांच्या संघटनांनी करोना प्रसाराच्या संबंधातील अधिकृत माहिती जाहीर करण्याची मागणी कंपनीकडे वारंवार केली होती. त्यानुसार त्यांनी हा आकडा जाहीर केला आहे. अमेरिकेतील तसेच जगाच्या अन्य भागातील मोठ्या कंपन्यांनीही त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या स्थितीची आकडेवारी जाहीर करावी, अशी मागणीही अ‍ॅमेझॉनने केली आहे.

या कंपनीत एकूण 13 लाखांहून अधिक कर्मचारी आहेत आणि 1 मार्च ते 19 सप्टेंबर या अवधीत सर्वच कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्याचा अहवाल जाहीर करण्याची आमच्यावर कायदेशीर बंधन नाही, अशी भूमिका कंपनीने सुरुवातीला घेतली होती पण अखेर त्यांनी हा आकडा जाहीर केला आहे.

अ‍ॅमेझॉन कंपनीतर्फे अन्नपदार्थ तसेच किराणा वस्तूंचेही अमेरिकेत मोठ्या प्रमाणात वितरण केले जाते. घरोघरी जाऊन या वस्तूंचे वितरण करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. या व्यवस्थेतील कर्मचारीच बहुतांशी करोनाग्रस्त झाले आहेत. अ‍ॅमेझॉन कंपनीने कर्मचाऱ्यांच्या जीविताची पुरेशी काळजी घेतली नसल्याचा आरोप तेथील कामगार संघटनांनी केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.