वितरण कधी? ‘भारत बायोटेक’च्या लसीबाबत अजूनही ‘सस्पेन्स’

पुणे – “भारत बायोटेक’च्या “कोवॅक्सिन’ लस वापराबाबत केंद्र सरकारचे अद्याप निर्देश आले नाहीत. त्यामुळे ती लस आताच दिली जाणार नाही, असे राज्य लसीकरण प्रमुख डॉ. दिलीप पाटील यांनी सांगितले.

 

 

ताडिवाला रस्त्यावरील राज्याच्या मध्यवर्ती लस भांडारात बुधवारी दुपारी 2 वाजता “भारत बायोटेक’च्या 20 हजार लसी राज्याच्या आरोग्य विभागाने ताब्यात घेतल्या. मात्र, याबाबतचे निर्देश केंद्राकडून राज्याला मिळाले नसल्याने, ती लस अद्याप वितरित करण्यात आली नसल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.

 

 

“भारत बायोटेक’ची लस देण्याआधी संबंधित लाभार्थीकडून लेखी सहमती घेण्याविषयी केंद्राने सुचित केले आहे. मात्र, तो अर्ज कसा असेल ही माहिती अद्याप राज्यांना मिळाली नाही. परंतु जेव्हा ही लस दिली जाणार आहे तेव्हा ती एकाच ठिकाणी ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने लाभार्थी असतील तेथे दिली जाणार आहे. जेणेकरून 28 दिवसांनी त्यांनाच ती देणे सोपे होईल, असे डॉ. पाटील म्हणाले.

 

 

पहिल्या दिवशी लसीचे जे लाभार्थी आहेत त्यांची यादी 15 जानेवारी रोजी जाहीर होईल. संबंधितांना तसे वेळेबाबत “एसएमएस’द्वारे कळवले जाणार आहे. ही यादी सर्वसमावेशक करण्यात आली आहे. याचा अर्थ म्हणजे डॉक्टर, नर्स, अन्य वैद्यकीय सहाय्यक यांचा समावेश पहिल्या 100 जणांमध्ये आहे.

 

 

सुरक्षा नियम आवश्यकच

करोना संसर्गाची भीती आणि लॉकडाउनसंदर्भातील नियम लागू आहेतच; त्यामुळे लस घेण्यासाठी केंद्रावर येताना सुरक्षेच्या नियमांचे पालन करावे लागणारच आहे. त्यामध्ये मास्क, ग्लोव्हज वापरणे. दोन व्यक्तींमध्ये अंतर राखणे आदी नियमांचे पालन करावे लागणार आहे.

 

 

लसीकरण मोहिमेवर उपसंचालक पदाचे आठ अधिकारी नोडल अधिकारी म्हणून काम करणार आहेत. त्यांना नेमून दिलेल्या जिल्ह्यामध्ये ते लक्ष ठेवणार आहेत. ते एकप्रकारे “स्कॉड’चेच काम करणार आहेत. लस देण्यासाठी राज्यानेच नेमलेले कर्मचारी असतील.

– डॉ. दिलीप पाटील, राज्य लसीकरण प्रमुख

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.