हैदराबाद – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत बायोटेकच्या हैदराबाद येथील येथील प्रकल्पाला भेट देऊन करोनावरील संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या लसीच्या उत्पादनाची स्थिती जाणून घेतली.
भारत बायोटेकचे संस्थापक आणि चेअरमन कृष्णा इल्ला यांनी त्यांना ही माहिती दिली. या लशीच्या अनेक बाजू समजाऊन घेत त्यांनी कंपनीच्या संशोधकांशी तासभर संवाद साधला.
तेथून बाहेर पडल्यानंतर मोदी यांनी ट्विट केले असून हैदराबादमधील भारत बायोटेक कंपनीने मला त्यांच्या लसीची माहिती दिली. आतापर्यंत केलेल्या चाचणीत आजवर केलेल्या प्रगतीबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्यांचे पथक वेगाने प्रगती करण्यसाठी आयसीएमआरसोबत कार्यरत आहे, असे त्यात म्हटले आहे.
भारत बायोटेकने एक निवेदन प्रसिध्दीस दिले आहे. पंतप्रधानांच्या भेटीमुळे आमच्या पथकाला प्रेरणा मिळाली आहे. सार्वजनिक आरोग्याचे प्रश्न आणि करोनाशी सुरू असणारे देशाचे युध्द यात वैज्ञानिक संशोधनासाठी असणारी आमची कटीबध्दता त्यामुळे वाढली आहे. त्यांनी दिलेल्या प्रतिसादामुळे आम्ही गहिवरलो आहोत, असे त्यात म्हटले आहे.
या लसीची निर्मिती आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांपर्यंतच्या प्रवासात भारत सरकार, लस विकसित करणारे भागिदार, वैद्यकीय संशोधक अणि नियामकांचे आम्ही आभार मानत आहोत, असे त्यात म्हटले आहे.