IPL 2024 (PBKS vs SRH Match 23) : आयपीएल 2024 चा 23 वा सामना पंजाब किंग्ज संघ आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. या सामन्यात पंजाब किंग्जला 2 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण सनरायझर्स हैदराबाद संघाने पंजाब किंग्जला विजयासाठी 183 धावांचे लक्ष्य दिले, प्रत्युत्तरात पंजाब किंग्ज संघ केवळ 180 धावाच करू शकला. पंजाब किंग्जच्या फलंदाजांना पॉवरप्लेमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. याच कारणामुळे संघाच्या नावावर एका नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे.
पंजाब किंग्जच्या नावे ‘हा’ नकोसा विक्रम….
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध पंजाब किंग्जचे फलंदाज फ्लॉप ठरले आणि त्यांना मोठी धावसंख्या करता आली नाही. पॉवरप्लेमध्ये पंजाब संघाने 3 गडी गमावून 27 धावा केल्या. जो आयपीएल 2024 च्या पॉवरप्लेमध्ये कोणत्याही संघाचा सर्वात कमी स्कोअर आहे. राजस्थान रॉयल्स संघ दुसऱ्या स्थानावर आहे. आयपीएल 2024 मध्ये, राजस्थानने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पॉवरप्लेमध्ये 31 धावा केल्या आहेत.
IPL 2024 च्या पॉवरप्लेमध्ये सर्वात कमी धावा करणारे संघ :
पंजाब किंग्ज- 27 धावा
राजस्थान रॉयल्स- 31 धावा
चेन्नई सुपर किंग्ज- 32 धावा
पॉवरप्लेमध्ये गमावल्या तीन विकेट..
सलामीवीर जॉनी बेअरस्टो खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतल्याने पंजाब किंग्जची सुरुवात चांगली झाली नाही. यानंतर प्रभासिमरन सिंगही 4 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर कर्णधार शिखर धवन 14 धावा करून बाद झाला. अशा प्रकारे पॉवरप्लेमध्ये पंजाबने तीन विकेट गमावल्या.
नितीश रेड्डीची उत्कृष्ट खेळी…
सनरायडर्स हैदराबाद संघाकडून नितीश रेड्डीने उत्कृष्ट खेळी खेळली. त्याने 37 चेंडूत 64 धावा केल्या. त्याच्याशिवाय ट्रॅव्हिस हेडने 21 धावा केल्या. त्याच्याशिवाय अब्दुल समदने 25 धावांचे योगदान दिले. या खेळाडूंमुळेच सनरायझर्स हैदराबाद संघ मोठी धावसंख्या करू शकला.