केंदूर – शिरूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील उपबाजार केंद्रामध्ये आवक वाढल्याने बाजार समितीचे उत्पन्न वाढले आहे.
2012 मध्ये स्थापन झालेल्या या उपबाजार हा राज्यभरात व्यापारी, शेतकऱ्यांसाठी प्रचलित होत आहे. माजी सभापती प्रकाश पवार, (स्व) वसंतराव डावखरे, माजी आमदार पोपटराव गावडे, आमदार अशोक पवार यांच्या विशेष प्रयत्नातून पिंपळे जगताप येथे शिरूर बाजार समितीचे उपकेंद्र स्थापन झाले आहे. सुरुवातीला आवक कमी असल्याने उत्पन्नाचे प्रमाण कमी होते.
मात्र, नोव्हेंबर 2017 पासून पिंपळे जगताप मार्केट यार्डमध्ये आवकचे प्रमाण वाढले आहे. दररोजची भाजीपाल्याची अवाक दीड लाखांहून अधिक होत आहे. पाचशे ते सातशेच्या दरम्यान तरकारी डागांची आवक होत आहे. शिरूर तालुक्याच्या संपूर्ण भागातून त्याचबरोबर दौंड, पारनेर, आंबेगाव, खेड तालुक्यांतील शेतकरी भाजीपाला आणि तरकारी शेतीमाल घेऊन येत आहेत.
तीस एकर परिसर असलेल्या बाजार आवारात शेतीमाल विक्रीसाठी 15 आडत केंद्र आहेत. त्याचबरोबर वाशी, पनवेल, पुणे, ठाणे, पिंपरी, भोसरी, कल्याण, औरंगाबाद, जळगाव आदी भागातून तब्बल शंभरहून अधिक खरेदीदार व्यापारी येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा त्वरित उठाव
होत आहे.
24 तासांच्या आत शेतमालाची पट्टी मिळत असल्याने शेतकऱ्यांची विश्वासार्हता वाढली आहे. स्थानिक शेतकरी डोक्यावर, दुचाकीवर देखील माल विक्रीस घेऊन येत आहेत. चाकण – शिक्रापूर रस्त्यालगत हे बाजार समितीचे आवार असल्याने शेतकऱ्यांना वाहतूक कोंडीचा सामना कमी प्रमाणात करावा लागत आहे.
24 तास पन्नास टनी वजन काटा, सिमेंट क्रॉंकीटचे अंतर्गत रस्ते, कॅन्टीन, पिण्याचे पाणी, शेतकरी निवास आदी सुविधांनी परिपूर्ण असलेल्या पिंपळे जगताप मार्केट यार्डने यावर्षी चाकण, खेड येथील भाजीपाला आणि तरकारी मार्केटला मागे टाकत पुणे गुलटेकडी मार्केटच्या तोडीस विक्रमी भाजीपाला आणि तरकारी आवक वाढवली आहे.
दरम्यान, पिंपळे जगताप मार्केटमुळे स्थानिक तरुणांना आणखी रोजगार मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे. जवळच मार्केटयार्ड असल्याने स्थानिक शेतकरी भाजीपाला, तरकारी शेतीकडे आकर्षित झाले आहेत. सभापती शशिकांत दासगुडे उपसभापती विश्वास ढमढेरे, प्रकाश पवार, बाबासाहेब सासवडे, आबाराजे मांढरे, शंकर जांभळकर, सुदीप गुंदेचा यांच्या विशेष प्रयत्नातून लवकरच मार्केटमध्ये कांदा, बटाटा, लसूण मार्केट सुरु होणार असल्याची माहिती पिंपळे जगताप उपकेंद्राचे विभागप्रमुख अनिल ढमढेरे यांनी दिली.
पिंपळे जगतापचे उपकेंद्र ज्याप्रमाणे भाजीपाला, तरकारीसाठी उत्तम मार्केट म्हणून परिसरात परिचित आहे. त्याचप्रमाणे कांदा, बटाटासाठी देखील हे मार्केट यार्ड लवकरच प्रसिद्ध होईल, शेतकऱ्यांनी तरकारीप्रमाणे कांदा देखील विक्रीसाठी घेऊन यावा.
-विश्वास ढमढेरे, उपसभापती, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती.