अशोक पवार यांच्या हस्ते सरबत घेऊन वाळुंज यांनी उपोषण सोडले
शिरूर- रामलिंग जुने शिरूर ते अण्णापूर रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता यांनी आमदार अशोक पवार यांच्या उपस्थितीत दिल्याने दोन दिवसांपासून निलेश वाळुंज यांनी रस्त्यांच्या कामासाठीचे सुरू केलेले उपोषण मागे घेण्यात आले आहे.
आमदार अशोक पवार व बाजार समितीचे सभापती दसगुडे यांच्या हस्ते लिंबू पाणी देऊन हे उपोषण मागे घेण्यात आले. शिरूर ते अण्णापूर रस्त्याचे काम कपूर कन्स्ट्रक्शन यांना दिले होते. परंतु हे काम निकृष्ट दर्जाचे होते. हे काम दर्जेदार व्हावे यासाठी निलेश वाळुंज यांनी बांधकाम विभागाशी संपर्क साधला. हे काम लवकर सुरू व्हावे, यासाठी पत्रव्यवहार केला होता.
परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या पत्रव्यवहाराला केराची टोपली दाखवली होती. सामाजिक कार्यकर्ते अण्णापूरचे रहिवासी निलेश वाळुंज यांनी हे अर्धवट काम लवकर सुरू व्हावे, या मागणीसाठी बांधकामच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. आमदार पवार यांनी भेट दिली. रस्त्यासाठी जो निधी लागेल तो देण्याचे मान्य केले. अभियंता एम. आर. सोनवणे यांनी हे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले.