पुणे – पाथ-वे फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित दोशी इंजिनियर्स करंडक आंतरक्लब 25 वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत गुरवीर सिंग सैनी(6-30) याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मेट्रो क्रिकेट क्लब संघाने पीवायसी हिंदू जिमखाना संघाचा 145 धावांनी धुव्वा उडवत शानदार सुरुवात केली. तर डेक्कन जिमखाना, व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी आणि अँबिशियस क्रिकेट अकादमी या संघांनी विजयी सलामी दिली.
प्रथम फलंदाजी करताना मेट्रो क्रिकेट क्लब संघाला 47.4 षटकात सर्वबाद 224 धावा करता आल्या. याच्या उत्तरात मेट्रो क्रिकेट क्लबच्या गुरवीर सिंग सैनी (6-30) व मिर्झा अकिब (3-30) यांच्या भेदक माऱ्यापुढे पीवायसी हिंदू जिमखाना संघाचा डाव 21.2 षटकात सर्वबाद 79 धावांवर आटोपला.
डेक्कन जिमखाना संघाने क्लब ऑफ महाराष्ट्र संघाचा 4 गडी राखून पराभव केला. अन्य लढतीत अंबिशियस क्रिकेट अकादमी संघाने पूना क्लब संघाचा 3 गडी राखून तर, व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने युनायटेड स्पोर्टस क्लब संघाचा 3 गडी राखून पराभव केला.
स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे (एमसीए) खजिनदार शुभेंद्र भांडारकर, दोशी इंजिनियर्सचे संचालक अमित दोशी, वाईड विंग्जचे राजेंद्र मनोहर आणि चॅम्पियन स्पोर्टसचे अमित मदन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महादेव जाधव, पीवायसी हिंदू जिमखानाचे मानद सचिव सारंग लागू, क्लबच्या क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड, पाथ-वे फाउंडेशनचे सचिव सिद्धार्थ निवसरकर आदी उपस्थित होते.