पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या विस्तारित मेट्रो मार्गाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी आॅनलाइन हिरवा झेंडा दाखवण्यात आला. तसेच आज पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी या विस्तारित मार्गाचे भूमिपूजनही करण्यात आले.
यापूर्वी ६ मार्च २०२२ रोजी पीसीएमसी ते फुगेवाडी या सात किलोमीटर आणि वनाज ते गरवारे पाच किलोमीटर मेट्रो मार्गांचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले होते. फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट ६.९१ किमी आणि गरवारे ते रुबी क्लिनिक ४.७५ किमी अशा मेट्रोच्या टप्प्यांचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते १ ऑगस्ट २०२३ रोजी करण्यात आले होते.
त्यानंतर आज रुबी हाॅल ते रामवाडी या सहा किलोमीटर मार्गाचे लोकार्पण करण्यात आले. आता पुणे मेट्रो कोथरूड ते नगरस्त्यापर्यंत असणार आहे. उद्घाटनांतर दुपारी १२ पासून ही सेवा नियमित करण्यात आली आहे.
पिंपरी ते निगडी मेट्रोचे भूमिपूजन
पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी या पहिल्या टप्प्यातील मेट्रोचे भूमिपूजन देखील करण्यात आले. हा मार्ग ४.४ किमीचा असून पूर्णपणे उन्नत मार्ग आहे. यामुळे स्वारगेट ते पीसीएमसी कॉरिडॉर हा निगडीपर्यंत विस्तारित होणार आहे.
२०१६ मध्ये स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड मार्गास मान्यता देण्यात आल्यानंतर स्वारगेट ते कात्रज आणि पिंपरी-चिंचवड ते निगडी या मार्गावर मेट्रोचा विस्तार करण्याची मागणी केली जात होती. त्यातील पिंपरी-चिंचवड ते निगडी या मार्गास केंद्राची मान्यता मिळालेली असून स्वारगेट ते कात्रज मार्गाची मान्यता अंतिम टप्प्यात आहे.