पालिकेचा निर्णय; रस्त्यांची अवस्था म्हणजे “ये रे माझ्या मागल्या…’
स्वच्छ कराडच्या रस्त्यांवर खड्ड्यांसह धुळीचे साम्राज्य
ठेकेदाराचा रस्त्याला की पालिकेला मुलामा?
नागरिकांना सहन करावा लागतोय त्रास
सुनिता शिंदे
कराड – कराडमधील रस्त्यांची अवस्था म्हणजे ये रे माझ्या मागल्यासारखी झाली आहे. प्रत्येक वर्षी पावसाने हे रस्ते उखडतात आणि पावसाळा संपत आला की नागरिकांच्या समाधानासाठी त्यावर फक्त तात्पुरता मुलामा दिला जातो. ठेकेदारांकडून नागरिकांबरोबरच पालिकेलाही मुलामा देण्याचे काम गेली अनेक वर्षे सुरू आहे. त्यामुळे पालिकेने हॉटमिक्स करणाऱ्या ठेकेदारांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी शहरातील सर्व ग्रीट गोळा करून या ठेकेदारांची भेट घेत कामाचा दर्जा तपासण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.
कराड शहरातील रस्त्यांसाठी शासनाकडून मोठा निधी मंजूर झाला. या निधीच्या माध्यमातून रस्त्यांची कामेही झाली. मात्र कमी कालावधीतच रस्ते उखडू लागले. रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठाले खड्डे पडले असून काही ठिकाणी रस्त्यांवरील खडी निघून गेली आहे. कार्वे नाका परिसरातील रस्त्यांची सततच्या खुदाईने अक्षरश: वाट लागली आहे. हा रस्ता नेमका खड्ड्यात आहे की खड्डा रस्त्यात आहे हेच कळत नाही. वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. या रस्त्याच्या मानाने शहरातील रस्त्यांची अवस्था बरी म्हणण्याची वेळ आली आहे.
कराड शहरात लाखो रूपयांचा निधी खर्चून रस्ते बनवले गेले असलेतरी त्याचे काम दर्जाहीन झाले आहे. त्यामुळेच रस्त्यांची दुर्दशा झाली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असतानाही पालिकेकडून मात्र त्याच ठेकेदारांना पुन्हा रस्त्यांचे काम दिले जात असल्याने यात काही पालिका आणि ठेकेदार यांचे लांगेबांधे असण्याची शक्यता नागरिकातून बोलले जात आहे. दत्त चौक ते आझाद चौक हा शहरातील महत्त्वाचा रस्ता असल्याने येथे वाहनधारकांची सतत रहदारी असते. त्यामुळे किमान या रस्त्याचे काम दर्जेदार होणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
दर्जाहीन कामामुळे प्रत्येक पावसात रस्ता उखडला आहे. यावर्षी कराडवर महापुराचे संकट ओढावले होते. सलग तीन दिवस पुराचे पाणी रस्त्यांवर असल्याने रस्त्यांची वाट लागली आहे. ग्रीट पूर्णत: उखडल्याने वाहनधारकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. नगरपालिकेने शुक्रवारपासून रस्त्यांवरील ग्रीट गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. मात्र सतत ग्रीट उखडण्याचे प्रकार घडत असल्याने सर्व रस्त्यावरील ग्रीट एकत्रित गोळा करून हॉटमिक्स करणाऱ्या ठेकेदारांची भेट घेण्याचे आदेश मुख्याधिकारी यांनी बांधकामच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.