पुणे -स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत ज्येष्ठ नागरिक, बसने प्रवास करणारे शालेय विद्यार्थी यांच्या हस्ते ई-बसचे उद्घाटन करण्यात आले. “पुणे स्मार्ट सिटी’तर्फे स्मार्ट मोबिलिटीच्या अंतर्गत पीएमपीएमएलच्या ताफ्यात नव्याने 50 स्मार्ट ई-बस दाखल करण्यात आल्या. या प्रसंगी, पीएमपीच्या 57 सीएनजी बसेसही ताफ्यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
यावेळी राज्याचे महसूलमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, संजय काकडे, महापौर मुक्ता टिळक, आयुक्त सौरभ राव, पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप, पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालिका नयना गुंडे, संचालक सिद्धार्थ शिरोळे आदी उपस्थित होते.
स्मार्ट इलेक्ट्रीक बसच्या प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात एकूण 150 इलेक्ट्रीक बसची खरेदी करण्यात येत आहे. त्यापैकी 9 मीटर लांबीच्या नॉन-बीआरटी 25 एसी इलेक्ट्रीक बस, 12 मीटर लांबीच्या 125 बीआरटी एसी इलेक्ट्रीक बस असणार आहेत. पहिल्या टप्प्यातील 25 बसची खरेदी झाली होती. त्यानंतर आणखी बस दाखल झाल्या आहेत. त्याचबरोबर 57 सीएनजी बससुद्धा दाखल झाल्या आहेत.