सांगवी,(वार्ताहर) – सांगवी फाटा ते नवी सांगवी दरम्यान महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या रस्त्याचे काम धिम्या गतीने सुरू असल्याने वाहनांना वळसा घालून फेमस चौकात येऊन मार्गस्थ व्हावे लागत आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामाचा वेग वाढविण्याची अपेक्षा नागरिकांसह वाहनचालक करीत आहेत. या रस्त्याचे काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे रस्ता एकेरी केल्याने वाहनचालकांची तारांबळ उडत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून असुरक्षितपणे काम सुरू आहे.
अगोदरच संथगतीच्या कामामुळे वाहनचालक वैतागले आहेत. टप्प्याटप्प्याने रस्त्याची खोदाई न करता सांगवी फाटा ते नवी सांगवी चौकापर्यंत रस्ता एका बाजूने बंद ठेवला आहे. हा रस्ता अगोदरच अरुंद आहे. त्यामुळे वाहतूकही नियमित मंदावते. तसेच या कामात गेल्या अनेक दिवसांपासून दिरंगाई असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. एवढेच नाही तर जवळच बाबुराव घोलप महाविद्यालय असल्याने अनेक विद्यार्थी याच रस्त्याचा जाण्या-येण्यासाठी वापर करत आहेत.
मुख्य म्हणजे वाकडकडून येणारी वाहने पिंपळे गुरव, सांगवी, दापोडीकडे येण्यासाठी आणि पिंपळे गुरव, नवी सांगवी, दापोडीकडून औंध, पिंपळे निलख, वाकडकडे जाण्यासाठी याच मार्गाचा वापर करतात. आयटी कंपनीतील बहुतांश कामगार हे या परिसरात राहत असल्याने त्यांना या ठिकाणी रखडलेल्या कामाचा त्रास सहन करावा लागत आहे.
समाधानकारक बाब म्हणजे नुकतेच या रस्त्याचे एका बाजूने काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. हा रस्ता वाहतुकीसाठी सुरू केल्यानंतर सांगवी फाट्याकडे जाणार्या लेनवर काँक्रिट टाकण्यात येणार आहे. म्हणजे वाहनचालकांना हा उन्हाळा तरी त्रास सहन करावा लागणार आहे. किमान पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे काम पूर्ण व्हावे, अशी वाहनचालक, विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे.
येथून पुणे शहराकडे जाणार्या नागरिकांची संख्या आहे. महापालिकेने येथे रस्त्याचे काम सुरू केले. मात्र, जेवढ्या जलदगतीने काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्या वेगाने काम होताना दिसत नाही. हा महत्त्वाचा रस्ता असल्याने शक्य तितक्या लवकर काम पूर्ण होणे आवश्यक आहे.- मनोज डांगे, एक वाहनचालक