लंडन :- पुरुष व महिलांना तालिबानच्या राज्यात समान दर्जा दिला जात नसल्याने आंतरराष्ट्रीय (International Olympic Committee) ऑलिम्पिक समितीने अफगाणिस्तानला मोठा इशारा दिला आहे. 2028 सालच्या ऑलिम्पिकमध्ये टी-20 क्रिकेटचा समावेश असला तरीही त्यात अफगाणिस्तानच्या संघाला पात्रता मिळणार नसल्याचा हा इशारा आहे. तालिबानने यात काही बदल केल्यास त्यांना संधी मिळू शकते, असेही समितीने म्हटले आहे.
भारतात सुरु असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तानच्या संघाने अफलातून कामगिरी केली. त्यांना उपांत्य फेरी गाठण्यात जरी यश मिळाले नसले तरीही त्यांनी नवखे असल्याचा कोणताही परिणाम होऊ न देता बलाढ्य संघांनाही पराभूत करत आपला दर्जा सिद्ध केला. मात्र, त्यांच्या देशात आता तालिबानची राजवट असून तिथे महिलांना पुरुषांसारखा समान दर्जा दिला जात नसून त्यांच्यासाठी भिन्न न्याय आहे. त्यांच्या देशाच्या महिलांना जोपर्यंत समान दर्जा दिला जात नाही तोपर्यंत ऑलिम्पिकसारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये त्यांच्या पुरुष संघालाही सहभागी होता येणार नसल्याचे समितीने म्हटले आहे.
लॉस एंजलिसमध्ये 2028 साली होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत समावेश होत असलेल्या क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानला परवानगी द्यायची किंवा कसे ते अद्याप निश्चित झालेले नसले तरीही समितीने त्यांना इशारा दिला आहे.
जवळपास 100 वर्षांनंतर क्रिकेटचे ऑलिम्पिकमध्ये पुनरागमन होत आहे. अफगाणिस्तानचा पुरुषांचा संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण प्रगती करत असला तरी त्यांच्या तालिबान सरकारने महिलांचे क्रिकेट बंद केले आहे. या निर्णयात आयसीसीचा हस्तक्षेप नसेल असेही समितीनं म्हटले आहे. अफगाणिस्तानचा महिलांचा संघही क्रिकेट संघ खेळत होता. मात्र, तालिबाननं सत्ता हाती घेतल्यावर 2021 सालापासून महिलांचे क्रिकेट बंद केले.
आयसीसी करणार चर्चा…
आयसीसी लवकरच तालिबान सरकारशी चर्चा करणार असून त्यांचे महिला क्रिकेट पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जर तालिबानने सकारात्मक प्रतिसाद दिला तरच त्यांच्या पुरुष क्रिकेट महिलांच्या संघासह ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत येणार आहे. मात्र, तसे घडले नाही तर पुरुष संघाचा सहभागही धोक्यात येणार आहे.