पणजी – 54 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान गोव्यात आयोजित केला जाईल, अशी घोषणा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज केली. या वर्षीचा “सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार’ हॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेते आणि निर्माते मायकल डग्लस यांना प्रदान करण्यात येणार आहे. इफ्फीच्या आंतरराष्ट्रीय विभागात चित्रपटांच्या संख्येत तिप्पट वाढ झाली आहे, असे ठाकूर यांनी सांगितले.
ओटीटी व्यासपीठावरील उत्कृष्ट आशय निर्मात्यांचा गौरव करण्यासाठी या वर्षीच्या महोत्सवात या पुरस्कारासाठी 15 ओटीटी व्यासपीठावरुन 10 भाषांमधील एकूण 32 प्रवेशिका प्राप्त झाल्या असून विजेत्यांना दहा लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.देशाच्या दुर्गम भागातील, कानाकोपऱ्यातील प्रतिभावंताचा शोध घेण्यासाठी आम्ही ‘क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो’ उपक्रम सुरू केला आहे. यावर्षी या विभागात 600 हून अधिक प्रवेशिका दाखल झाले आहेत. या चित्रपट महोत्सवातील आंतरराष्ट्रीय ज्युरीचे नेतृत्व प्रख्यात भारतीय चित्रपट निर्माते शेखर कपूर करणार असल्याची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.
इफ्फीच्या “आंतरराष्ट्रीय विभागात’ 198 चित्रपट असतील, यात 13 वर्ल्ड प्रीमियर्स, 18 इंटरनॅशनल प्रीमियर्स, 62 एशिया प्रीमियर्स आणि 89 इंडिया प्रीमियर्स असतील. या वर्षी इफ्फी मध्ये 105 देशांमधून 2926 चित्रपटांसाठी विक्रमी प्रवेशिका प्राप्त झाल्या,आहेत.’इंडियन पॅनोरमा’ विभागात भारतातील 25 फीचर फिल्म्स आणि 20 नॉन फीचर फिल्म्स दाखवल्या जातील. फीचर विभागात अट्टम या मल्याळम चित्रपटाने आणि नॉन फीचर विभागात मणिपूरच्या एंड्रो ड्रीम्स चित्रपटाने महोत्सवाचा प्रारंभ होईल.या वर्षी सर्वोत्कृष्ट वेब मालिका (ओटीटी) पुरस्काराचा समावेश करण्यात आला आहे. 15 ओटीटी प्लॅटफॉर्मवरून 10 भाषांमध्ये 32 प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात 12 आंतरराष्ट्रीय आणि 3 भारतीय असे 15 चित्रपट प्रतिष्ठित सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार, सुवर्ण मयूर आणि 40 लाख रुपये पुरस्काराच्या स्पर्धेसाठी निवडले गेले आहेत. सर्वोत्कृष्ट चित्रपट पदार्पण दिग्दर्शक 5 आंतरराष्ट्रीय 2 भारतीय चित्रपट या विभागात प्रतिष्ठित रौप्य मयूर, 10 लाख रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्रासाठी स्पर्धा करतील. सिनेमा ऑफ द वर्ल्ड या विभागात 103 चित्रपटांचा समावेश आहे, महोत्सवाचा ऍनिमेशन विभागामध्ये पोलंडच्या “द पीझंट्स आणि भारतीय ऍनिमेशन चित्रपटांचा समावेश आहे.
शेखर कपूर यांच्या नेतृत्वाखाली परीक्षक मंडळ
प्रख्यात भारतीय चित्रपट निर्माते आणि अभिनेता शेखर कपूर यांच्या अध्यक्षतेखाली स्पॅनिश सिनेमॅटोग्राफर जोस लुईस अल्केन; मार्चे डू कान्सचे प्रतिष्ठित माजी प्रमुख जेरोम पेलार्ड; फ्रान्समधील प्रख्यात चित्रपट निर्माते कॅथरीन दुसार्ट; ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध चित्रपट निर्मात्या हेलन लीक हे या चित्रपट महोत्सवासाठी परीक्षक असतील.
इफ्फीच्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात 40 हून अधिक महिला चित्रपट दिग्दर्शिकांच्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांचा समावेश आहे. प्रख्यात चित्रपट निर्माते,सिनेमॅटोग्राफर आणि अभिनेत्यांसोबत 20 हून अधिक “मास्टरक्लासेस’ आणि “संवाद ‘ सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. एकूणच, 300 हून अधिक आंतरराष्ट्रीय चित्रपट प्रकल्प या वर्षी निर्मिती, वितरण किंवा विक्रीसाठी चित्रपट बाजारच्या 17 व्या आवृत्तीत तयार केले जातील आणि प्रदर्शित केले जातील.