खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवू म्हणणं न्यायालयाचा अपमान

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संथ न्यायप्रक्रियेवर व्यक्‍त केली चिंता

मुंबई : राज्यातील आणि देशातील संथ न्यायप्रक्रियेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली. आजच्या घडीला जलद न्याय देण्याची गरज आहे. सामान्य जनतेच्या मनातील भावना ओळखून काम करण्याची गरज आहे. कारण, न्याय मिळण्यातील विलंबामुळे शेतकरी फासावर लटकतो. कुठे काही घडतं. सरकार तातडीनं हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवू म्हणतं. पण, फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवू असं म्हणणं हा सुद्धा न्यायालयाचा अपमानच आहे, अशी खंत मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ठाकरे यांच्या हस्ते नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नियोजित इमारतीचं भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी न्यायालयाच्या संथ कामावर भाष्य केलं. सामान्य माणसाच्या मनातील भावना ओळखून वेळेत न्यायदान व्हायला हवं. आज जलद न्याय देण्याची गरज आहे. काल लासलगावला घटना घडली. सरकारनं या घटनेचा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवू असं जाहीर केलं. पण, हे असं म्हणणं न्यायालयाचा अपमान आहे. कारण मग जी न्यायालये काम करताहेत ती संथ आहेत का? असा प्रश्न पडतो. अशीच एक घटना दिल्लीत घडली, ज्यामुळे अवघा देश ढवळून निघाला. तो खटला फास्टट्रॅक चालला की माहिती नाही. न्यायालयानं फाशी दिली, पण अंमलबजावणी अजूनही झालेली नाही, असं ठाकरे म्हणाले.

अनेक प्रकरणात शेतकऱ्यांना न्यायाची प्रतीक्षा असते. पण, त्याला वेळेत न्याय मिळत नाही आणि हताश होऊन तो स्वतःला संपवतो. अशा घटना थांबायला हव्या. ब्रिटिश काळांपासून चालत आलेले कायदे बदलण्याच विचार व्हायला हवा. न्यायालयांनी यासाठी पुढाकार घ्यायला हवा, असं आवाहनही ठाकरे यांनी केलं.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.