मांजरी -महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून होत असलेल्या मांजरी बुद्रुक येथील पाणीपुरवठा योजनेचे काम काही अंशी बाकी आहे. तसेच रेल्वेगेट वरील उड्डाणपुलाचे कामही अंतिम टप्प्यात आहे. या कामांची पाहणी खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि आमदार चेतन तुपे यांनी केली. काम वेळेत तसेच वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी खासदार, आमदारांनी संबंधीत अधिकाऱ्यांना केल्या.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिलीप घुले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम भांडेकर, अभियंता महादेव देवकर, महापालिका पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी अनिरुद्ध पावसकर, सुभाष पावरा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता नकुल रणसिंग आदिंसह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व मांजरी बुद्रुक येथील ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, खासदार डॉ. कोल्हे यांनी पाणी योजनेतील उर्वरित कामे जलदगतीने कार्यन्वित करण्यासाठी करावी लागणारी उपाययोजना याची माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली. याशिवाय मांजरी बुद्रुक उड्डाणपूल येथेही अधिकारी व ठेकेदार यांना निर्देश दिले.
मांजरी येथील रेल्वे फाटकावरील उड्डाणपुलाचे काम अद्यापही प्रलंबित आहे. मागील वर्षी रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक रेणू शर्मा व इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठका व प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यानंतर खऱ्याअर्थाने कामाला गती मिळाली. परंतु, सर्व्हिस रस्त्याच्या भूसंपादनाची नुकसान भरपाई रक्कम मिळकतधारकांना मान्य नसल्याने भूसंपादन थांबले व पर्यायाने कामही थांबले. यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्याची विनंती केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी सोमवारी भेटीला बोलावले आहे.
– डॉ. अमोल कोल्हे, खासदार ,शिरूर लोकसभा
खासदार डॉ. कोल्हे आणि मी सतत पाठवपुरावा करून मांजरीची नळपाणी पुरवठा योजना पूर्णत्वास गेली आहे. या प्लान्टची तसेच उड्डाणपुलाची आज पाहणी केली. यावेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली आहे. या चर्चेतून मांजरी परिसरातील नागरिकांच्या दृष्टीकोणातून महत्त्वपूर्ण असलेले प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.
– चेतन तुपे, आमदार, हडपसर