फलटण – फलटण येथील सराईत गुन्हेगार सुरज बोडरे व त्याच्या 12 साथीदारांविरुध्द मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली असून गुन्हेगारी क्षेत्राला हा मोठा दणका दिल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. कोल्हापूर परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी या मोक्का कारवाईस मंजुरी दिली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली आहे. दरम्यान नोव्हेंबर 2022 पासून 4 मोक्का प्रस्तावामध्ये 44 गुन्हेगारांविरुध्द मोक्का कायद्यांतर्गत धडक कारवाई झाल्याने गुन्हेगारी विश्वाचे धाबे दणाणले आहेत.
याबाबत पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी, जबर दुखापत घडवुन आणण्याच्या प्रयत्नासह दरोडा, जबरी चोरी, अपहरण, जबर दुखापत, बेकायदेशीर जमाव जमवून मारहाण, शिवीगाळ, दमदाटी, अपहरण, आर्म ऍक्ट अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे अनेक गुन्हे या टोळीवर दाखल असून टोळी प्रमुख सुरज बोडरे याने टोळीची दहशत पसरविण्यासाठी फलटण तालुक्यातील इतर गुन्हेगारी टोळीतील सदस्यांना एकत्र करुन दहशत पसरविल्याचे निष्पन्न झाले आहे.
त्यामुळे फलटण ग्रामीण पोलिस ठाणे अनेक दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी टोळी प्रमुख सुरज वसंत बोडरे, (वय 23, रा. 5 सर्कल, खामगाव, ता. फलटण) व त्याचे साथीदार ज्ञानेश्वर उर्फ नन्या वसंत बोडरे, (28, रा. 5 सर्कल, खामगाव, ता. फलटण), उमेश संजय खोमणे (वय 26, रा. गाडगे महाराज आश्रमशाळेच्या समोर, खराडवाडी, ता. फलटण), रणजित कैलास भंडलकर (रा. होळरोड, खामगाव, ता. फलटण), अमर संतोष बोडरे, (रा. पिंपळवाडी, ता. फलटण), सचिन दत्तात्रय मंडले, (रा. गणेशनगर, साखरवाडी, ता. फलटण), तानाजी नाथाबा लोखंडे (वय 30, रा. खामगाव ता. फलटण), शरद उर्फ बाबू नंदकुमार पवार (वय 20, रा. पाच सर्कल, खामगाव ता. फलटण), शंभू आनंदा ननावरे (वय 22, रा. पाच सर्कल खामगाव ता. फलटण), वैभव हणमंत चव्हाण (वय 26, रा. वारे वस्ती खामगाव ता. फलटण),
सनी मोहन बोडरे (वय 26, रा. पाच सर्कल खामगाव ता. फलटण), श्रीकांत गुलाब बोडरे (वय 38, रा. पाच सर्कल खामगाव ता. फलटण), गणेश बाळु मदने (वय 18, रा. खामगाव, ता. फलटण) या सर्व 13 जणांच्या विरुध्द पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी दाखल गुन्ह्यांची माहिती संकलित करुन आरोपींचे विरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये कारवाईसाठी पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्फतीने कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्याकडे मोक्का अंतर्गत प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावास विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी मंजुरी दिली असून नमुद गुन्ह्यात मोक्का कायद्याची कलमे लावून या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांच्याकडे देण्यात आला आहे.
मोक्का प्रस्ताव मंजुरीसाठी पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे व गणेश माने, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अमित सपकाळ, अंमलदार संजय राऊत, वैभव सूर्यवंशी, अमोल जगदाळे अभिजित काशीद, अजय कडेकोट, स्वप्निल खराडे यांनी परिश्रम घेतले.