कराड – राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पुणे- बंगळुरू महामार्गवर मालखेड येथे गोव्यावरुन नाशिककडे जाणारी बेकायदा गोवा बनावट विदेशी दारुची वाहतूक पकडून ओमकारलाल भगवानलाल मेहता (रा. अदकालीया जि. उदयपूर, राजस्थान) याला अटक करुन त्याच्याकडून 52 लाख 78 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. त्याचाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या कारवाईमध्ये 180 मि.ली. क्षमतेच्या विदेशी दारुच्या एकूण 19,200 बाटल्या, 750 मि. ली. क्षमतेच्या एकूण 1,500 बाटल्या (एकूण 525 बॉक्स), एक सहाचाकी आयशर ट्रक, मोबाइल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक भरारी पथकाने आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, संचालक सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व कोल्हापूर विभागीय उपायुक्त डॉ. एच. बी. तडवी, प्र. अधीक्षक वैभव वैद्य यांच्या नेतृत्वाखाली आज ही कारवाई केली.