पुणे – धर्मादाय रुग्णालयांमधील गरिबांसाठी आरक्षित असलेले बेड त्यांना पारदर्शकपणे उपलब्ध होण्यासाठी आता शासनाने ऑनलाइन प्रणाली विकसित करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. या यंत्रणेद्वारे आरक्षित बेडमधील उपलब्ध अथवा रिक्त बेडची रियल टाइम माहिती, कोणत्या रुग्णालयात उपचाराची सुविधा उपलब्ध होणार आहे, ही माहिती एका क्लिकवर मिळणार आहे.
राज्यात 400 हून अधिक धर्मादाय रुग्णालये असून या रुग्णालयांमधील काही बेड हे गरीब रुग्णांना मोफत उपचारासाठी अथवा सवलतीच्या दराने उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. मात्र, गरीब रुग्णांना धर्मादाय रुग्णालयांमध्ये बेड पारदर्शकपणे उपलब्ध होत नसल्याच्या अनेक तक्रारी शासनाकडे आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ऑनलाइन प्रणाली विकसित करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या समितीमध्ये एकूण सात सदस्य असणार आहेत. याबाबतचा शासन निर्णय उपसचिव अजित सासुलकर यांनी जारी केला.
असा आहे नियम
धर्मादाय रुग्णालयांनी एकूण बेडच्या 20 टक्के बेड गरीब रुग्णांकरिता राखीव ठेवणे बंधनकारक आहे. एकूण 20 टक्के पैकी 10 टक्के बेड निर्धन रुग्णांना संपूर्ण मोफत व 10 टक्के बेड गरीब रुग्णांसाठी 50 टक्के सवलतीच्या दरात उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.