- कांदा वधारला : बटाट्याच्या भावात किरकोळ घसरण
पिंपरी – मोशीतील उपबाजारात रविवारी (दि. 30) भाजीपाल्याची क्विंटलने आवक वाढली तर पालेभाज्यांची 6 हजार गड्ड्यांनी आवक वाढली. मागणी अभावी फळांची आवक मात्र 46 क्विंटलने घटली आहे. राज्यात कांद्याचे दर वधारले असताना, गेल्या आठवड्याच्या तुलनेत मोशी उपबाजारातही कांद्यांचे दर क्विंटलमागे 150 रुपयांनी वधारले. याशिवाय बहुतांशी सर्वच फळभाज्यांची आवक वाढून, दरही वधारले आहेत.
कांद्याची आवक 300 क्विंटलने घटून भावात 150 रुपयांची वाढ झाली. तर बटाट्याची 76 क्विंटलने आवक वाढून, भाव 150 रुपयांनी घसरले. लसणाची एक क्विंटल आवक वाढून, भाव एक हजार रुपयांनी वाढले. आल्याची 87 क्विंटलने आवक घटून भाव 250 रुपयांनी वधारले. भेंडीची आवक 33 क्विंटलने वाढून भावात 250 रुपयांची वाढ झाली. वांगी, गाजर, कारली व गवारीची आवक वाढूनही भाव मात्र स्थिर राहिले. तर पावटा व मिरचीची आवक घटूनही भाव स्थिर राहिले.
टोमॅटोची 39 क्विंटलने आवक घटून, भावात 400 रुपयांची घसरण झाली. मटारची 34 क्विंटलने आवक वाढून भाव हजार रुपयांनी वधारला. घेवड्याची सात क्विंटल आवक घटून भाव हजार रुपयांनी वधारला. दोडक्याची 22 क्विंटल आवक घटून भाव 250 रुपयांनी घटले. दुधी भोपळ्याची पाच क्विंटलने आवक वाढून भाव 250 रुपयांनी वाढले. काकडीची सहा क्विंटल आवक वाढून भावात 150 रुपयांची वाढ झाली. फ्लॉवरची 11 क्विंटल आवक वाढून भाव 400 रुपयांनी वधारले. कोबीची आवक तीन क्विंटलने घटून भाव 150 रुपयांनी वधारले. ढोबळीची 13 क्विंटल आवक घटून भावात 650 रुपयांची घसरण झाली.
सुरणची एक क्विंटल आवक होऊन भाव एक हजार रुपयांवर स्थिरावला. वालवरची पाच क्विंटल आवक वाढून भाव 750 रुपयांनी गडगडले. चवळीची आवक स्थिर राहून भावात 700 रुपयांची वाढ झाली. मक्याची 22 क्विंटल आवक वाढून भावात किरकोळ 100 रुपयांची घट झाली. तर लिंबाची आवक 11 क्विंटलने घटून भाव 300 रुपयांनी वधारले.
पालेभाज्यांमध्ये मेथीच्या सर्वाधिक 8310 गड्ड्यांची आवक झाली. त्या खालोखाल कोथिंबीरीची 6200 गड्ड्या, पालकच्या 2700 गड्डया, शेपूच्या 1500 गड्डया, कांदापात 1200 गड्डया तर पुदीन्याच्या 800 गड्डया आवक झाली.