पुणे- हॉटेलमध्ये जायच असेल तरच गाडी लावा… बिनधास्त लावा… कोणीही तुमची गाडी उचलणार नाही. आम्ही आहोत ना. वर्दळीच्या जंगली महाराज रस्त्यावर गाडी पार्क करण्यासाठी पालिकेने सोय केली आहे. मात्र, हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांची गैरसोय होऊ नये यासाठी हॉटेल मालकाने सिक्युरिटी ठेवली असून पालिकेच्या रस्त्यावरच “वॅलेट पार्किंग’चा फलक लावला आहे. यावर कळस म्हणजे “बिनधास्त गाडी लावा पोलीस कारवाई करत नाहीत’ अशी भाषा येथील सिक्युरिटी वापरतात. त्यामुळे वाहतूक पोलिसांचा आणि पालिकेच्या पथ विभाग आणि अतिक्रमण विभागाचा किती दरारा आहे, हे यावरून कळते.
करोनानंतर नियमात शिथिलता आल्यानंतर रस्त्यावर वाहनांची वर्दळ दिसू लागली असली तरी नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे आहे. वाहतूक पोलीसही नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करीत आहे. मात्र, जंगली महाराज रस्त्यावर असलेल्या या हॉटेलसमोरील बेशिस्तपणे वाहने लावणाऱ्यांवर वाहतूक पोलीस कारवाई का करीत नाही. या रस्त्यावर फिरणारी टोइंग व्हॅनवरील कर्मचाऱ्यांना रस्त्यावर दोन लाइनमध्ये लागलेल्या दुचाकी दिसत नाही का? महापालिकेने या हॉटेलमालकाला रस्त्यावर वाहने उभी करण्याची परवानगी दिली आहे का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.