खासदार संजय पाटील यांचा दावा
सांगली – मी भारतीय जनता पक्षाचा खासदार आहे, त्यामुळे माझ्याकडे ईडी कधीच येणार नाही, असा दावा भारतीय जनता पक्षाचे सांगली येथील खासदार संजय पाटील यांनी एका जाहीर समारंभात केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मध्यंतरी भारतीय जनता पक्षात गेलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मी भाजप मध्ये गेल्याने माझ्यावर चौकशीचे गंडातर येणार नसल्याने मला चांगली झोप लागते असे विधान केल्यानंतर आता खासदार संजय पाटील यांचे हे विधान आल्याने त्याची आता वेगळ्या स्वरूपात चर्चा सुरू झाली आहे.
केवळ विरोधकांना लक्ष्य करण्यासाठीच भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सातत्याने केला आहे. त्या आरोपाला संजय पाटील यांच्या विधानाने एकप्रकारे पुष्टीच मिळाल्याचे मानले जात आहे. मला तिकडे तिकीट नाकारल्यामुळे मी भाजपमध्ये आलो आहे, असेही विधान खासदार संजय पाटील यांनी केले आहे.