मागणीत झाली 70% घट
चंदिगड – करोना व्हायरसमुळे विविध क्षेत्रांवर परिणाम होत आहे. हिवाळ्यात वापरण्याच्या गरम कपड्यांच्या उद्योगांवरही यामुळे परिणाम झाला आहे.
पंजाब राज्यात काही भागात गरम कपड्यांचा उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो. मात्र, यावर्षी देशभरातून येणाऱ्या गरम कपड्यांच्या मागणीत 70 टक्के घट झाली आहे. त्यामुळे जून, जुलै, ऑगस्ट या काळात कपडे निर्मितीवर मोठा परिणाम झाला आहे. लुधियाना येथील गरम कपड्यांचे उत्पादक अजित कातरा यांनी सांगितले की या वर्षी मागणी 70 टक्क्यांनी कमी झाली आहे. त्याचबरोबर जी मागणी आली आहे तीसुद्धा कॅन्सल होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे सध्या गेल्या वर्षाच्या तुलनेत फक्त 30 ते 35 टक्के काम आमच्या कारखान्यात चालू आहे. उन्हाळ्यात घालावयाच्या सुती कापडाच्या बाबतीतही असाच प्रकार झाला होता. आता हिवाळ्यात घालायच्या कपड्यांच्या उत्पादनावरही परिणाम झाला आहे. आम्हाला ऑर्डर्स मिळत नसल्यामुळे उत्पादन करता येत नाही. आता ऑर्डर मिळाल्या तरी त्या पूर्ण करून देशभरात पुरवठा करणे अवघड जाणार आहे. एक तर खरेदी कमी होईल या शक्यतेमुळे ऑर्डर आल्या नाहीत. त्याचबरोबर वाहतूक व्यवस्थेतील अडथळ्यामुळे पुरवठ्यावरही परिणाम होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.
सध्याच्या परिस्थितीत लोक बचत करण्याच्या मनःस्थितीत आहेत. त्यामुळे हिवाळ्यात घालायचे कपडे नव्याने खरेदी करण्याचे ग्राहक लांबणीवर टाकू शकतात. जुने कपडे वापरण्यावर या काळात भर दिला जाण्याची शक्यता आहे. ज्या ऑर्डर मिळाल्या आहेत ते काम पूर्ण करणे अवघड झाले आहे.
कारण बरेच कामगार आपल्या राज्यात परत गेले आहेत. त्यामुळे यंत्रसामग्रीसाठी घेतलेल्या कर्जाचा हप्ता कसा द्यायचा हा मोठा प्रश्न आमच्यासमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे या क्षेत्रातील एनपीए वाढण्याची शक्यता असल्याचे कातरा यांनी सांगितले.
सरकारच्या मदतीची गरज
जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंची खरेदी थांबली आहे. त्यामध्ये गरम कपड्यांचा समावेश आहे. त्यामुळे या उद्योगांवर अवलंबून असणाऱ्या लाखो लोकांवर परिणाम झाला आहे. त्यासाठी सरकारने या क्षेत्राला मदत करण्याची गरज असल्याचे उद्योजकांनी सांगितले. यंत्रसामग्रीसाठी घेतलेल्या कर्जाचा हप्ता देण्यासाठी सवलत आणि व्याजदरात काही सवलत मिळण्याची अपेक्षा असल्याचे ते म्हणाले.