इंग्लंडविरुद्ध गाफील राहू नका – मोरे

मुंबई  – ऑस्ट्रेलियात मिळवलेल्या यशामुळे भारताने गाफील न राहता इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी अधिक जोमाने तयारी करावी. त्यांनी इंग्लंडला अजिबात कमी लेखू नये, असा सल्ला भारताचे माजी यष्टीरक्षक फलंदाज किरण मोरे यांनी दिला आहे.

भारत व इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला येत्या शुक्रवारपासून प्रारंभ होणार असून यापूर्वीच्या भारत दौऱ्यात इंग्लंडला 4-0 असा पराभव पत्करावा लागला होता. 2012 साली मात्र, इंग्लंडने भारताला 2-1 असे पराभूत केले होते. आयसीसी क्रमवारीत इंग्लंडचा संघ चौथ्या स्थानी आहे. मात्र, कोणत्याही संघाला त्यांच्याच भूमीत हरवण्याची इंग्लंडमध्ये क्षमता आहे. भारताने ऑस्ट्रेलियात केलेली कामगिरी वाखाणण्याजोगीच आहे. परंतु म्हणून मायदेशात खेळताना त्यांनी इंग्लंडला कमी लेखू नये,असे मोरे म्हणाले.

कोणत्याही मालिकेसाठी इंग्लंडचा संघ नेहमीच पूर्ण तयारीनिशी येतो. प्रमुख खेळाडूंवरील खेळाच्या ताणाचे ते योग्य व्यवस्थापन करतात. श्रीलंकेविरुद्ध बेन स्टोक्‍स, जोफ्रा आर्चर यांच्या अनुपस्थितीत त्यांनी दमदार कामगिरी केली. आता त्यांचेही पुनरागमन झाले आहे. त्याशिवाय जेम्स ऍण्डरसन व स्टुअर्ट ब्रॉड यांच्या रूपात इंग्लंडकडे सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांची जोडी आहे. त्यामुळे ही मालिका रंगतदार होईल,असेही मोरे यांनी सांगितले.

प्रक्षेपण हक्काच्या शर्यतीत चॅनेल-4

भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेचे टीव्हीवर थेट प्रक्षेपण करण्यासाठी विदेशातील क्रीडा वाहिन्यांमध्ये अद्यापही संघर्ष सुरू असून सध्या चॅनेल-4 समूह या शर्यतीत अग्रेसर आहे. इंग्लंडमधील बीटी स्पोर्टस आणि स्कार्य स्पोर्टस यांच्यात करारावरून झालेल्या मतभेदांमुळे यंदा 15 वर्षांनंतर प्रथमच चॅनेल-4 ला एखाद्या आंतरराष्ट्रीय सामन्याचे थेट प्रक्षेपण करण्याची संधी मिळेल.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.