#INDvENG : मर्यादित षटकांच्या मालिकेला रोहित, पंत मुकणार

अहमदाबाद – भारतीय संघ करोनाच्या धोक्‍यानंतर आता सातत्याने खेळत असल्याने आगामी मालिका तसेच आयपीएल स्पर्धा डोळ्यासमोर ठेवत बीसीसीआय रोहित शर्मा व ऋषभ पंत यांना विश्रांती देण्याच्या विचारात आहे.

इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका संपल्यावर सुरू होत असलेल्या टी-20 व एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी त्यांना विश्रांती दिली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. कसोटी मालिका पार पडल्यानंतर अहमदाबादमध्येच 5 टी-20 सामन्यांची मालिका होणार आहे. तसेच त्यानंतर पुण्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकांमध्ये नवोदितांना संधी देत रोहित व पंत यांच्यासह प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यालाही विश्रांती दिली जाणार आहे. त्यांच्या जागी नवोदित खेळाडूंना संधी मिळण्याचेही संकेत आहेत.

रोहित, पंत यांच्यासह वॉशिंग्टन सुंदर हे अमिरातीत गेल्या वर्षी झालेल्या आयपीएलपासून सातत्याने क्रिकेट खेळत आहेत. तसेच ते गेल्या बऱ्याच महिन्यांपासून बायोबबल सुरक्षेमध्ये आहेत. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यातही ते खेळले होते, त्याचबरोबर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतही ते खेळत आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिका पार पडल्यावर एप्रिल महिन्यापासून आयपीएलला सुरुवात होणार आहे. आयपीएल जवळपास दीड महिने सुरु राहणार असल्याने त्यांच्यावर प्रचंड ताण येण्याची शक्‍यता असल्याने बीसीसीआय हा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. या खेळाडूंना टी-20 संघात स्थान दिले गेले असले तरीही त्यात बदल होऊ शकतो, असे सूतोवाच बीसीसीआयने केले आहे.

सातत्याने बायोबबलमध्ये राहिल्यामुळे खेळाडूंच्या मानसिकतेवर परिणाम होऊ नये या साठी इंग्लंडने आपल्या संघातील तीन खेळाडूंना मायदेशी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. मोइन अली हा पहिल्या दोन कसोटी सामन्यानंतरच मायदेशी रवाना झाल होता.

भारताचा टी-20 संघ – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, इशान किशन, युजवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्‍सर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवातिया, टी. नटराजन, भुवनेश्‍वर कुमार, दीपक चहर, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर.

भारतीय संघाचा कसून सराव

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील अखेरच्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघातील सर्व खेळाडूंनी नेटमध्ये कसून सराव सुरू केला आहे. दुखापतीतून पूर्ण तंदुरुस्त ठरलेला वेगवान गोलंदाज उमेश यादवनेही सुमारे तीस मिनिटे गोलंदाजीचा सराव केला. तो तंदुरुस्त ठरल्यानंतरही त्याला तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळालेली नव्हती. मात्र, आता प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला या सामन्यासाठी विश्रांती दिली जाण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत असल्याने उमेशला संघात संधी मिळण्याचा अंदाज आहे. उमेशसह संपूर्ण संघाने फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, चेंडूफेक आणि झेल घेण्याचा कसून सराव केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.