अग्रलेख : कॉंग्रेसचा “जी 23’चा अध्याय

कॉंग्रेसच्या जवळपास सर्वच ज्येष्ठ नेत्यांनी आपला एक वेगळा गट स्थापन करून पक्षाच्या नेतृत्वाला आव्हान दिल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. या नेत्यांनी जम्मूत एकत्र जमून पुन्हा एकदा आपले वेगळे अस्तित्व दाखवून देत पुन्हा पक्षनेतृत्वाला एक प्रकारे आव्हानच दिल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आधीच अडचणीत आलेल्या कॉंग्रेस पक्षापुढे आता एक नवीनच अडचण निर्माण झाली आहे.

अर्थात, जम्मूत जमलेल्या या प्रमुख नेत्यांनी कॉंग्रेस नेतृत्वाला उघडपणे आव्हान देणारे कोणतेही थेट वक्‍तव्य केलेले नाही किंवा त्यांनी गांधी परिवारावर उघड टीका केलेली नाही. उलट या नेत्यांनी जम्मूतील बैठकीत भाजपच्याच कारभारावर टीका केल्याचे दिसून आले आहे. हा टिपीकल कॉंग्रेसी शैलीच्या राजकारणाचाच नमुना आहे. “ताकासाठी तर जायचे पण भांडे पण लपवायचे’ असाच हा सारा मामला असतो. त्यानुसार या नेत्यांनी आपल्या बैठकीला “शांतता परिषद’ असे नाव देऊन यात बंड वगैरे काही नाही असे दाखवतानाच आपल्या मनात आता पक्षाच्या नेतृत्वाविषयी वेगळेपणाचीच भावना रूजू लागली आहे, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला आहे.

हे नेते इतके ज्येष्ठ आहेत की त्यांच्यापैकी एकाने जरी उघडपणे पक्षातून फुटून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला तरी कॉंग्रेसपुढे मोठी बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते. मनीष तिवारींपासून गुलामनबी आझादांपर्यंतच्या नेत्यांची ही फळी आहे. कॉंग्रेसचे पिलर समजले जावेत अशा ताकदीचे हे नेते आहेत. त्यांना “जी 23′ अशी वेगळी उपाधी मिळाली आहे. त्या उपाधीचा त्यांनीही इन्कार केलेला नाही. मुळात हे सारे प्रकरण पक्षाला सक्रिय अध्यक्ष असावा या विषयापासून सुरू झाले. राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्ष सोडल्यानंतर हे पद राजकारणापासून दूर गेलेल्या सोनिया गांधींकडे दिले गेले. ही तात्पुरती व्यवस्था असेल असे सुरुवातीला वाटले होते.

राहुल गांधी यांना थोडा स्पेस देण्यासाठी सोनियांना तात्पुरते अध्यक्ष केले गेले असावे, असे स्पष्ट दिसत असल्याने या नवीन व्यवस्थेविषयी सुरुवातीला कोणीच काही बोलेले नाही. पण जसजसा नवीन पक्षाध्यक्ष नेमण्याला विलंब होत गेला तसा या ज्येष्ठांचा धीर सुटत गेला. या अवधीत पक्षाला अनेक नामुष्कीजनक पराभवांना सामोरे जावे लागले. पक्ष पूर्ण निर्नायकी स्थितीत गेल्यानेच ही स्थिती उद्‌भवत आहे अशी भावना या 23 नेत्यांनी व्यक्‍त करीत सोनिया गांधींना मध्यंतरी एक पत्र लिहिले होते. त्यात पक्षाला दृश्‍य स्वरूपातला सक्रिय अध्यक्ष असणे गरजेचे आहे, अशी भावना स्पष्ट शब्दात व्यक्‍त करण्यात आली होती. ती चुकीची नव्हती. पण त्यांच्या या सूचनेला वाटाण्याच्याच अक्षता लावल्या गेल्या. नंतर या पत्राचा विषय बासनात गुंडाळला गेला. येत्या जून महिन्यापर्यंत कॉंग्रेसला नवीन अध्यक्ष दिला जाईल, अशी घोषणा झाल्यानंतर हा विषय पूर्ण मागे पडला होता. पण पुन्हा या नेत्यांनी जम्मूत एकत्र येऊन आपले वेगळेपण दाखवून दिल्याने कॉंग्रेसमध्ये निर्माण झालेली दुफळी कायम राहिली आहे, हे अधोरेखीत झाले आहे. ही स्थिती कॉंग्रेससाठी शोभादायक नाही.

मुळातच गलितगात्र झालेली कॉंग्रेस, पक्षाच्या 23 ज्येष्ठ नेत्यांच्या फारकतीमुळे आणखीनच दुबळी भासू लागली आहे. हे एक चित्र एकीकडे असले तरी काही जणांच्या मते कॉंग्रेसच्याच रणनीतीकारांची ही स्ट्रॅटेजी होती की ऐवीतेवी आयतेच सापडलेल्या या पक्षाच्या जुन्या खोंडांना सक्रिय राजकारणापासून दूर सारण्यासाठी हा एक उत्तम मौका आहे, आणि आपण तो साधला पाहिजे. त्यानुसार कॉंग्रेसच्या रणनीतीकारांनी तो साधला आहे, असेही काही जाणकारांचे मत आहे. ही सारी मंडळी वर्षानुवर्ष कॉंग्रेसमधील व राजकारणातील महत्त्वाची पदे अडवून बसली होती. गुलामनबी आझादांसारख्यांनी तर तब्बल 50 वर्षांची सत्ता उपभोगली आहे.

कॉंग्रेसच्या मंत्रिमंडळात या नेत्यांच्या व्यतिरिक्‍त दुसरे कोणतेच नाव दिसत नसायचे. त्यामुळे यांना आता दूर सारण्याची आयती संधी चालून आल्यांनतर पक्षाच्या धोरणकारांनी त्यांचे मन वळवण्याचा फार प्रयत्न केलेला दिसला नाही. या ज्येष्ठ नेत्यांना स्वतःची वेगळी वाट चोखाळायची असेल तर त्याला आमचीही काही हरकत नाही असाच संदेश कॉंग्रेसकडूनही त्यांना दिला गेला आहे. आज कॉंग्रेसपुढे मोदी आणि भाजपचे अत्यंत कडवे आव्हान उभे आहे. त्या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी ज्या हिरीरीने प्रचारात उतरले पाहिजे तितकी हिरीरी या नेत्यांकडून आतापर्यंत कधीच दाखवली गेली नाही. मोदींकडून ईडीची कारवाई होईल याच धास्तीत हे नेते वावरताना दिसले.

मोदींच्या धोरणांवर एकटे राहुल गांधी सतत तुटून पडत असताना त्यांना पक्षातून जे कव्हर फायरिंग मिळायला हवे ते या नेत्यांनी कधीच दिले नाही. मोदींच्या विरोधात लढण्याची सगळी जबाबदारी जणू एकट्या राहुल गांधींचीच आहे अशाच अविर्भावात हे नेते वावरत राहिले. राहुल गांधींनी मधल्या काळात पक्षात काही नवीन पायंडे सुरू करण्याचा प्रयत्न केला. पण ते उचलून धरण्याऐवजी त्यात खोडा घालण्याचेच काम या ज्येष्ठांकडून झाल्याने त्यांना आता वेगळे ठेवण्याची आयती संधी कॉंग्रेसच्या हायकमांडने साधली आहे, असेही म्हणतात.

थोडक्‍यात, आता या ज्येष्ठांना मार्गदर्शक मंडळात बसवण्याची प्रक्रिया कॉंग्रेसने सुरू केली आहे याचाच हा संकेत मानला जाऊ लागला आहे. पक्षांतर्गत राजकारणाचे हे काहीही संकेत असले तरी आता कॉंग्रेसमध्ये गांधी घराणे आणि 23 ज्येष्ठ नेते अशी उघड दुफळी पडली आहे हे मात्र स्पष्ट जाणवू लागले आहे. कॉंग्रेसच्या कार्यपद्धतीत सारे काही आस्तेकदम आणि अंदाज घेतघेतच केले जाते. हा एक स्थितीवादी पक्ष मानला गेला आहे. एकदम मोठा निर्णय हा पक्ष कधीच घेत नाही. धडाकेबाज राजकारण करणे हा कॉंग्रेसचा कधीच स्थायीभाव नव्हता. त्यामुळे पक्षात सध्या जी अदृश्‍य स्वरूपात दुफळी निर्माण झाली आहे त्यात कोणत्याही एका बाजूकडून आक्रमक किंवा स्पष्ट भूमिका घेतली जाणार नाही.

कॉंग्रेसमधील ही धुसफूस अशीच दमादमाने चालणार आहे. या 23 ज्येष्ठांना बाजूला सारून कॉंग्रेसला नव्या दमाची नेतृत्वाची फळी लोकांपुढे आणायची असेल तर त्यासाठी पक्षानेही अत्यंत तडफेने निर्णय घेणे गरजेचे आहे. कारण आता 2024 मधील लोकसभा निवडणुकीलाही जेमतेम तीन वर्षांचाच अवधी बाकी राहिला आहे. त्यामुळे एकमेकांचा अंदाज घेत वेळ काढण्यापेक्षा या “जी 23′ अध्यायाचा एकदाचा काय तो नीट सोक्षमोक्ष त्यांना लावावा लागणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.