इंदूर :- भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना नीचांकी धावसंख्येचा ठरत आहे. भारताचा पहिला डाव 109 धावांवर गुंडाळला गेल्यावर ऑस्ट्रेलियाचा पहिला डावही 197 धावांवर संपला. त्यानंतर भारताचा दुसरा डावही 163 धावांवर गडगडला व आता हा सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला अवघ्या 76 धावांची गरज आहे. अर्थात ही खेळपट्टी अत्यंत अनाकलनीय ठरत असून, यावर फिरकी गोलंदाजांचेच राज्य सिद्ध झाले आहे. तसेच पहिल्या दोन्ही कसोटींप्रमाणे हा कसोटी सामनाही तीन दिवसांच्या आतच संपणार हेदेखील स्पष्ट होत आहे.
Stumps on day two 🏏
Nathan Lyon ran through India’s batting lineup and registered a brilliant eight-wicket haul 👌#WTC23 | #INDvAUS | 📝: https://t.co/FFaPxt9fIY pic.twitter.com/PCAUqw8HVS
— ICC (@ICC) March 2, 2023
पहिल्या दिवशी भारताचा पहिला डाव 109 धावांवर संपल्यावर ऑस्ट्रेलियाने दिवसअखेर आपल्या पहिल्या डावात 4 बाद 156 धावा केल्या होत्या. त्यावेळी ते मोठी आघाडी घेतील असेच चित्र होते. मात्र, रविचंद्रन अश्विन आणि उमेश यादव यांनी त्यांच्या फलंदाजीची वाताहत केली. या दोघांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले व ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 197 धावांवर संपवला. यावेळी त्यांनी 88 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली.
यानंतर भारताचा दुसरा डाव सुरू झाला व पुन्हा एकदा प्रमुख फलंदाजांनी नांगी टाकली. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल, रवींद्र जडेजा व श्रीकर भरत यांनी केवळ हजेरी लावली. तंत्रशुद्ध फलंदाज चेतेश्वर पुजाराचे अर्धशतक तर श्रेयस अय्यरची 26 धावांची आक्रमक खेळी हीच काय ती भारतासाठी जमेची बाजू ठरली.
पुजाराने तब्बल 142 चेंडूंचा सामना करताना 5 चौकार व 1 षटकार फटकावत 59 धावांची खेळी केली. अय्यरने 27 चेंडूत 3 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 26 धावा केल्या. तळात अश्विन व अक्सर पटेल यांनी थोडीफार चमक दाखवली व संघाला दीडशतकी धावांच्या पुढे मदल मारून दिली. भारताचा डाव 163 धावांवर संपला. ऑस्ट्रेलियाकडून नाथन लॉयनने 8 गडी बाद केले. मिचेल स्टार्क व मॅथ्यू कुन्हेमन यांनी प्रत्येकी 1 बळी मिळवला.
Stumps on Day 2⃣ of the third #INDvAUS Test.@cheteshwar1 top-scores for #TeamIndia 🇮🇳 with a magnificent 59 (142) 👏🏻👏🏻
We will be back with Day three action tomorrow as Australia need 76 runs in the final innings.
Scorecard – https://t.co/t0IGbs2qyj @mastercardindia pic.twitter.com/m0xdph0GeA
— BCCI (@BCCI) March 2, 2023
तत्पूर्वी कालच्या 4 बाद 156 धावांवरून पुढे खेळताना ऑस्ट्रेलियाला पाठोपाठ धक्के बसले. उस्मान ख्वाजा 60 व मार्नस लेबुशेन 31 हे पहिल्या दिवशीच तंबूत परतल्यावर कर्णधार स्टिव्ह स्मिथने 26, कॅमेरुन ग्रीनने 21 तर पीटर हॅण्ड्सकॉम्बने 19 धावांची खेळी केली. गुरुवारी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी अश्विन व उमेशने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीची वाताहत केली. पहिल्या दिवशी चारही बळी मिळवणाऱ्या रवींद्र जडेजाला नंतर एकही गडी बाद करता आला नाही. मात्र, अश्विन व उमेशने 11 धावांच्या अंतरात 6 फलंदाज बाद करत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 197 धावांवर रोखला.
संक्षिप्त धावफलक –
भारत पहिला डाव – 33.2 षटकात सर्वबाद 109 धावा. (विराट कोहली 22, शुभमन गिल 21, श्रीकर भरत 17, उमेश यादव 17, अक्सर पटेल नाबाद 12, मॅथ्यू कुन्हेमन 5-16, नाथन लियॉन 3-35, टॉड मर्फी 1-23).
ऑस्ट्रेलिया पहिला डाव – 76.3 षटकांत सर्वबाद 197 धावा. (उस्मान ख्वाजा 60, मार्नस लेबुशेन 31, स्टिव्ह स्मिथ 26, कॅमेरुन ग्रीन 21, पीटर हॅण्ड्सकॉम्ब 19, रवींद्र जडेजा 4-78, उमेश यादव 3-12, रविचंद्रन अश्विन 3-44).
भारत दुसरा डाव – 60.3 षटकात सर्वबाद 163 धावा. (चेतेश्वर पुजारा 59, श्रेयस अय्यर 26, रवीचंद्रन अश्विन 16, अक्सर पटेल नाबाद 15, नाथन लॉयन 8-64).