मुंबई – सांताक्रूझ (पश्चिम) एस. व्ही. रोड येथील रॉयल हॉटेलच्या खालील भागातील फारसाणच्या दुकानात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेत लोकेश शर्मा (45) व शहा (74) हे दोघेजण जखमी झाले आहेत. त्यांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सांताक्रूझ (पश्चिम), एस. व्ही.रोड, आशा पारेख रुग्णालयाजवळील भागात तळापासून तीन मजली दुकाने आहेत. या दुकानावरील भागात रॉयल हॉटेल आहे. गुरुवारी सायंकाळी 4.45 वाजताच्या सुमारास नेहमीप्रमाणे दुकानात व्यवसाय चालू असताना फरसाणच्या दुकानात अचानकपणे आग लागली. ही आग हळूहळू भडकली.
दुकानातील कामगारांनी व मालकांनी सुरक्षिततेसाठी दुकानाच्या बाहेर धाव घेतली. दरम्यान, या आगीची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या जवानांनी फायर इंजिन, वॉटर टॅंकर यांसह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व मदतकार्य चालू केले.