पुणे – करोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने नुकतेच काही औद्योगिक क्षेत्रांकरिता शिथिलता दिली आहे. परंतु, पुण्यामध्ये करोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे ही शिथिलता पुणे महानगर क्षेत्रामध्ये म्हणजेच पुणे, पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण तसेच एमआयडीसी क्षेत्रामध्ये रद्द करण्यात आलेली आहे. येथे कोणतीच सवलत देण्यात आलेली नाही. त्यामुळे दि.17 एप्रिल पूर्वीचीच परिस्थिती कायम राहील, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
या क्षेत्रामध्ये फक्त मेडीसीन, एलपीजी अशा सारख्याच अत्यावश्यक सेवांना ज्यांना दि.17 एप्रिल पूर्वी परवानगी देण्यात आली आहे. त्याच सेवा आता चालू राहतील; परंतु या उद्योगांच्या व्यवस्थापनाने त्यांच्या कामगारांना लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये त्या उद्योगाच्या ठिकाणीच निवासाची व्यवस्था करणे आवश्यक आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना इतर ठिकाणी जाण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.