नवी दिल्ली – देशातील विमानभाडे सध्या गगनाला भिडले आहे. आता देशातील आघाडीची विमान कंपनी इंडिगोने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांच्या भाड्यात इंधन अधिभार जोडण्याची घोषणा केली आहे.
जेट इंधनाच्या किमती वाढल्यामुळे कंपनीला हे पाऊल उचलावे लागल्याचे इंडिगोचे म्हणणे आहे. इंधन शुल्क लागू झाल्याने इंडिगोची तिकिटे 300 ते 1000 रुपयांनी महागणार आहेत. यापूर्वी 2018 मध्ये देखील इंडिगोने इंधन अधिभार लागू केला होता, जो इंधनाच्या किमती कमी झाल्यानंतर हळूहळू काढून टाकण्यात आला होता.
इंडिगोने म्हटले आहे की, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गावरील वाढत्या ATF किमतींची भरपाई करण्यासाठी लादलेले इंधन शुल्क आजपासून म्हणजेच 6 ऑक्टोबर 2023 पासून लागू झाले आहे. गेल्या तीन महिन्यांत देशात एव्हिएशन टर्बाइन इंधन (ATF) च्या किमती सातत्याने वाढत आहेत. एटीएफ हा एअरलाइनच्या ऑपरेटिंग खर्चाचा एक मोठा भाग आहे. जेव्हा हा खर्च वाढतो तेव्हा विमान कंपन्या इंधन शुल्क आकारतात.
इंधन शुल्क 300 ते 1000 रुपयांपर्यंत –
इंडिगोने म्हटले आहे की, इंधन शुल्क संबंधित क्षेत्रातील अंतरावर अवलंबून असेल. किमतीतील बदलानुसार, इंडिगो फ्लाइटचे बुकिंग करणाऱ्या प्रवाशांना सेक्टरच्या अंतराच्या आधारे प्रति सेक्टर इंधन शुल्क भरावे लागेल. 500 किलोमीटरपर्यंतच्या अंतरासाठी 300 रुपये इंधन शुल्क आकारले जाईल. 501-1000 किलोमीटर अंतरासाठी 400 रुपये अतिरिक्त आकारले जातील.
1001 ते 1500 किलोमीटर अंतरासाठी तिकीट बुक करणाऱ्यांना इंधन शुल्क म्हणून 550 रुपये द्यावे लागतील. 1501-2500 किलोमीटर प्रवास करण्यासाठी तुम्हाला 650 रुपये जादा मोजावे लागतील. 2501 ते 3500 किलोमीटरच्या प्रवासासाठी प्रवाशाला 800 रुपये आणि 3501 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी प्रवाशाला 1000 रुपये इंधन शुल्क भरावे लागेल.
आधीच वाढले आहे विमान भाडे –
देशातील हवाई प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे हवाई भाडे आधीच लक्षणीय वाढले आहे. जेट इंधनाच्या किमती वाढल्याने आणि देशातील गो-फर्स्ट एअरलाइन सेवा स्थगित केल्यामुळे विमान तिकीटही महाग झाले आहे. दिवाळी-दसरा यांसारख्या सणांमध्ये तिकिटांची मागणी वाढल्याने या सणांच्या आसपासच्या दिवसांतच विमान तिकीट महाग झाले आहे.