नवी दिल्ली – देशाची राजधानी दिल्लीतील वायु प्रदुषणाबाबत मोठी चिंता व्यक्त केली जात असताना दिलासादायक बाब म्हणजे दिवाळीच्या दिवशी येथील हवेची गुणवत्ता सर्वोत्तम नोंदविली गेली आहे. दिल्लीकरांनी रविवारी स्वच्छ आकाश, भरपूर सूर्यप्रकाश अनुभवला असून वायु गुणवत्ता निर्देशांक (AQI) दुपारी 4 वाजता 218वर राहिला, जो किमान तीन आठवड्यांतील सर्वोत्तम आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, दिल्लीत गेल्या वर्षी दिवाळीत 312, 2021 मध्ये 382, 2020 मध्ये 414, 2019 मध्ये 337, 2018 मध्ये 281, 2017 मध्ये 319 आणि 2016 मध्ये 431 एक्यूआय नोंदवले गेले. शहरात शनिवारी सरासरी एक्यूआय 220 होता, जो आठ वर्षांतील दिवाळीच्या आदल्या दिवसातील सर्वात कमी आहे.
यंदाच्या दिवाळीपूर्वी दिल्लीच्या हवेच्या गुणवत्तेत झपाट्याने सुधारणा झाली आहे. शुक्रवारी अधूनमधून पडणारा पाऊस आणि प्रदूषकांच्या फैलावासाठी अनुकूल वाऱ्याचा वेगामुळे हवेत सुधारणा झाल्याचे दिसून आले.
गेल्या काही दिवसांत पंजाब आणि हरियाणासह वायव्य भारतातील बहुतेक भागांमध्ये पाऊस पडला. ज्यामुळे दिल्लीच्या वायू प्रदूषणात धुराचे प्रमाण कमी झाले. दरम्यान, दिल्लीकरांना 28 ऑक्टोबरपासून दोन आठवडे “अत्यंत खराब’ ते ‘गंभीर’ हवेची गुणवत्ता अनुभवली. या कालावधीत राष्ट्रीय राजधानीत धुके पसरले होते.