नवी दिल्ली – भारताचा स्टार कुस्तीपटू दीपक पुनिया याला आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेच्या 86 किलो गटात रजतपदकावर समाधान मानावे लागले. कझाकस्तानच्या अझमत दौलतबेकोव्हच्या भक्कम बचावापुढे निष्प्रभ ठरल्यामुळे पुनियाचे सुवर्णपदकाचे स्वप्न अपूर्ण राहिले.
92 किलो गटात विकी चहरला ब्रॉंझपदक मिळाले. या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यावहिल्या सुवर्णपदकाच्या आशेने दीपकने प्रतिस्पर्धी कुस्तीपटूला एकही गुण न देता अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. प्रथम त्याने इराणच्या मोहसीन अलनजगला 6-0 असे पराभूत केले. त्यानंतर कोरियाच्या ग्वानूक किमचा 5-0 असा पराभव केला. दौलतबेकोव्हविरुद्धच्या अंतिम सामन्यात दीपकने आक्रमक खेळ केला. मात्र, दौलतबेकोव्हने अफलातून खेळ करीत 6-1 असा हा सामना जिंकला.
ब्रॉंझपदकाच्या लढतीत विकीने उझबेकिस्तानच्या अजिनियाझ सपर्नियाझोव्हला 5-3 असे पराभूत केले. मंगल कडियानला मात्र ब्रॉंझपदकाने हुलकावणी दिली. किर्गिस्तानच्या उलूबेक झोल्डोशबेकोव्हकडून त्याने 4-6 असा पराभव पत्करला.
74 किलोच्या पात्रता लढतीत यश तुनिरने उझबेकिस्तानच्या इख्तियार नवरुझोव्हविरुद्धचा सामना 10-11 असा गमावला. 125 किलो गटाच्या उपांत्यपूर्व सामन्यात अनिरुद्ध कुमारने कोरियाच्या येहयून जंगविरुद्धची लढत 4-8 अशी गमावली.