नवी दिल्ली -भारताचा उदयोन्मुख बुद्धिबळपटू लिऑन ल्युक मेंडोसा याने हंगेरी येथे संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेतील विजयाने त्याचे एलो रेटिंगही सुधारले असून त्याला आता ग्रॅण्डमास्टर किताब मिळण्याच्या शक्यतेतही वाढ झाली आहे.
वयाच्या केवळ 14 व्या वर्षी लिऑनने 9 फेऱ्यांच्या या स्पर्धेत लिऑनने सहा डावात विजय मिळवला. दोन डावांत बरोबरी साधली व केवळ एक पराभव स्वीकारला. मात्र, गुणांमध्ये त्याने अन्य खेळाडूंवर मात करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. लिऑनचे एलो रेटिंग आता 2499 झाले आहे.
मूळचा गोव्याचा असलेल्या लिऑनला विजेतेपद निश्चित करण्यासाठी त्याला 9 व्या डावात सरस कामगिरी करणे आवश्यक होते. या डावात त्याने हंगेरीचा ग्रॅंडमास्टर ऍडम कोझाकवर मात केली व केवळ 0.5 गुणांच्या आघाडीच्या जोरावर विजेतेपद प्राप्त केले.