नगर -शहरातील जीपीओ चौकातील छावणी कॉम्प्लेक्समधील एका दुकानात बेकायदेशीर साठवून ठेवलेला डीझेलचा साठा जप्त करण्यात आला. मात्र, या डीझेलमध्ये भेसळ असल्याचा संशय पोलीस प्रशासनास आहे. त्यामुळे नगरमध्ये डीझेलचा काळा बाजार उघडकीस येण्याची शक्यता आहे. अपर पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांच्या विशेष पथकाने सोमवारी (दि.26) सायंकाळी ही कारवाई केली.
यावेळी एक टॅंकर व ट्रकसह एकूण साडेतेरा लाख रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. विशेष पथकाने डीझेलचा काळाबाजार करणारा आरोपी गौतम वसंत बेळगे (वय 38, रा. भिंगार) याला अटक केली आहे. घटनास्थळी पथकाला बेळगे हा टॅंकरमधून ट्रकमध्ये डीझेल भरताना आढळून आला ट्रक (क्र. एमएच- 16 टी- 999) व टॅंकर (क्र. एमएच- 17 एजे- 1638) पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये 1 हजार 937 लिटर डीझेड मिळून आले. पोलिसांनी ट्रक, टॅंकर व डीझेल, असा 13 लाख 45 हजार 275 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कारवाईत जप्त केलेले हे डीझेल भेसळयुक्त असल्याचा पोलिसांना संशय आहे. या डीझेलचे नमुने नाशिक येथील रासायनिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे तपासी अधिकारी प्रवीण पाटील यांनी सांगितले.