श्रीहरिकोटा – भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या(इस्रो) ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहनाने म्हणजेच पीएसएलव्ही यानाने शनिवारी सिंगापूरच्या दोन उपग्रहांचे अंतराळामध्ये यशस्वी प्रक्षेपण केले. इस्त्रोकडून आता व्यापारी तत्त्वांवर अन्य देशांचे उपग्रहही अवकाशात प्रक्षेपित केले जात आहेत. त्या कार्यक्रमांतर्गत हे प्रक्षेपण करण्यात आले आहे. या मोहिमेच्या यशस्वीतेमुळे भारताचा अंतराळात दबदबा वाढला आहे.
22.5 तासांच्या काउंटडाउननंतर चेन्नईपासून सुमारे 135 किमी अंतरावर असलेल्या सतीश धवन अंतरिक्ष प्रक्षेपण केंद्रामधून 2.19 वाजता या उपग्रहासह यानाचे प्रक्षेपण करण्यात आले. त्यानंतर काही वेळातच हे उपग्रह त्यांच्या नियोजित कक्षेत सोडण्यात आले आहेत. पीएसएलव्ही यानाची ही 57 वी अंतरिक्ष फेरी होती. या मोहिमेला “टीएलईओएस-2′ असे नाव देण्यात आले होते.
या मिशनमध्ये पुन्हा एकदा पीएसएलव्हीची उच्च विश्वासार्हता आणि व्यावसायिक मोहिमांसाठीची योग्यता सिद्ध झाली आहे. रॉकेटचा वरचा टप्पा उन्हाळी मोहीम पूर्ण करणार आहे. वरच्या टप्प्यावर सात पेलोड बसवले आहेत. जर सर्व काही सुरळीत झाले तर पुढील एक महिना ते कार्य करे, असे मिशन कंट्रोल सेंटरमधून तेजस्वी सोमनाथ यांनी यावेळी सांगितले. तर मिशन डायरेक्टर एस. आर. बिजू यांनीही, हे पूर्णपणे समर्पित व्यावसायिक मिशन अत्यंत अचूकतेने पार पाडले गेल्याचे सांगितले आहे.
कक्षेत पाठवले गेलेले उपग्रह
इस्रोने आपल्या ट्विटर हॅंडलवर सिंगापूरच्या दोन उपग्रहांच्या प्रक्षेपणाची माहिती दिली होती. त्याप्रमाणे शनिवारी श्रीहरिकोटा येथून पीएसएलव्ही-सीएस 55 रॉकेटने सिंगापूरच्या 741 किलो वजनाचा उपग्रह “टीएलईओएस-2′ आणि 16 किलो वजनाचा उपग्रह “लूमीलाईट-4′ यांच्यासह उड्डाण घेतले.
उपग्रहांची वैशिष्टये?
टीएलईओएस-2 हा एक रडार उपग्रह आहे. सिंगापूरच्या संरक्षण विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेने तो तयार केला आहे. हा एक कृत्रिम छिद्र रडार उपग्रह आहे. हा उपग्रह आपल्यासोबत सिंथेटिक अपर्चर रडार घेऊन जाणार असून तो दिवसा आणि रात्रीच्या हवामानाची अचूक माहिती देणार आहे. दुसरा उपग्रह लूमीलाईट-4 हा 16 किलो वजनाचा अत्यंत प्रगत उपग्रह आहे. या उपग्रहाला अतिशय उच्च वारंवारितेच्या डेटा एक्सचेंज सिस्टमच्या तांत्रिक प्रदर्शनासाठी विकसित केले गेले आहे. तसेच हा एक प्रगत “12 यू’ उपग्रह आहे. सिंगापूरच्या ई-नेव्हिगेशन सागरी सुरक्षेला प्रोत्साहन देण्यासाठी व जागतिक शिपिंग समुदायाला लाभ होण्यासाठी या उपग्रहाची रचना करण्यात आली आहे.